आयपीएलमध्ये "हा" विक्रम करणारा नेहरा पहिला गोलंदाज
By admin | Published: April 6, 2017 12:48 PM2017-04-06T12:48:29+5:302017-04-06T12:48:29+5:30
इंडियन प्रिमियर लिगच्या 10 व्या सत्राला काल हैदराबादमध्ये दणक्यात सुरूवात झाली.सनरायझर्स हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरला 35 धावांनी लोळवत गुणांचे खाते उघडले.
हैदराबाद : युवराज सिंग आणि मोइसेस हेन्रीक्स यांच्या धडाकेबाज अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर गतविजेत्या सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या दहाव्या सत्रात विजयी सलामी दिली. सुरुवातीपासून वर्चस्व राखलेल्या हैदराबादने रॉयल चँलेंजर्स बँगलोरला ३५ धावांनी लोळवत गुणांचे खाते उघडले. हैदराबादकडून खेळत असलेल्या अफगाणिस्तानच्या रशिद खानने अचूक मारा करताना आपली छाप पाडली. धडाकेबाज अर्धशतक झळकावलेल्या युवराजला सामनावीराने गौरविण्यात आले.
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर आरसीबीपुढे विजयासाठी २०८ धावांचे भलेमोठे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचा डाव १७२ धावांत गारद झाला. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचा एकही फलंदाज फारशी चमक दाखवू शकला नाही. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स या स्टार्सच्या अनुपस्थितीमध्ये संघाची मदार ख्रिस गेलवर अधिक होती. गेलने सुरुवातीला फटकेबाजी करुन बंगळुरुच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, नंतर बेन कटिंगच्या अप्रतिम गोलंदाजीवर तो सातत्याने चकला. यामुळे गेल काहीसा दडपणाखाली आला आणि याचा फायदा दीपक हूडाने घेत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. गेलने २१ चेंडूत २ चौकार व ३ षटकारांसह ३२ धावा केल्या.
ट्राविस हेड (३०) आणि केदार जाधव (३१) यांनी संघाकडून झुंज दिली. परंतु, हे दोघेही बाद झाल्यानंतर बंगळुरुकडून फारसा प्रतिकार झाला नाही. कर्णधार शेन वॉटसनने काहीवेळ झुंज दिली, परंतु आक्रमणाच्या नादात तो झेलबाद झाला. आशिष नेहरा, भुवनेश्वर कुमार आणि अफगाणिस्तानचा रशिद खान यांनी प्रत्येकी २ बळी घेत बंगळुरुला नमवले.
तत्पूर्वी, हैदराबादने हेन्रीक्स आणि युवराज या अष्टपैलू खेळाडूंच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर २० षटकांत २०७ मजबूत मजल मारली. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आक्रमक सुरुवात करुन दिली. मात्र, तो लगेच मनदीप सिंगकडे झेल देत तंबूत परतला. यानंतर शिखर धवन आणि हेन्रीक्स यांनी सुत्रे आपल्याकडे घेतली. एकेरी व दुहेरी धावा घेतानाच धावफलक हलता ठेवला. दोघेही स्थिर झाल्यावर त्यांनी चौकार, षटकारांची आतषबाजी केली. धवनने ३१ चेंडूत ४० धावा केल्या, तर हेन्रीक्स याने ३७ चेंडूत ५२ धावा केल्या.
स्टुअर्ट बिन्नीने आरसीबीला मोठे यश मिळवून देताना धवनला बाद केले. त्यानंतर युवराजचा धडाका सुरू झाला. त्याने २३ चेंडूत अर्धशतक करताना आयपीएलमध्ये जलद अर्धशतक ठोकले. त्याने २७
चेंडूत ६२ धावा करताना ७ चौकार व ३ षटकार ठोकले. बेन कटिंगने वॉटसनला दोन षटकार लगावत संघाला दोनशेचा आकडा पार करून दिला. दीपक हुड्डाने १२ चेंडूत १६ तर कटिंग्जने ६ चेंडूत १६ धावा केल्या. (वृत्तसंस्था)
रशिद खानची चमक
या सामन्यात आफगाण खेळाडू रशिद खानने सर्वांचे लक्ष वेधले. आयपीएलमध्ये खेळणारा पहिला अफगाण खेळाडू ठरलेल्या रशिदने अचूक फिरकी मारा करत आरसीबीच्या बलाढ्य फलंदाजीला जखडवून ठेवले.
सलामीवीर मनदीप सिंग आणि आक्रमक ट्राविस हेड यांना बाद करुन त्याने आरसीबीच्या फलंदाजीला खिंडार पाडले. रशिदने घेतलेल्या महत्त्वपूर्ण बळींमुळे आरसीबीचे फलंदाज दडपणाखाली आले. याचा फायदा हैदराबादच्या इतर गोलंदाजांनी घेत सामन्यावर कब्जा केला.
>संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकात ४ बाद २०७ धावा (युवराज सिंग ६२, मोइसेस हेन्रीक्स ५२, शिखर धवन ४०; स्टुअर्ट बिन्नी १/१०, युझवेंद्र चहल १/२२) वि.वि. रॉयल चँलेंजर्स बँगलोर : १९.४ षटकात सर्वबाद १७२ धावा (ख्रिस गेल ३२, केदार जाधव ३१, ट्राविस हेड ३०; भुवनेश्वर कुमार २/२७, रशिद खान २/३६, आशिष नेहरा २/४२)