लॉकडाऊनमध्ये घरीच लावली नवी ‘इलेक्ट्रॉनिक टार्गेट’ मशीन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 12:22 AM2020-05-09T00:22:42+5:302020-05-09T00:22:52+5:30
मनू भाकर : पुढील वर्षी ऑलिम्पिक आयोजनाचा विश्वास, चमकदार कामगिरीचा विश्वास
नवी दिल्ली : भारताची अव्वल पिस्तूल नेमबाज मनू भाकरने हरियाणामध्ये आपल्या निवासस्थानी ‘मॅन्युअल’ मशीनच्या स्थानी इलेक्ट्रॉनिक टार्गेट मशीन लावली आहे. कारण जुनी मॅन्युअल मशीन वारंवार खराब होत होती आणि त्यामुळे तिच्या आॅलिम्पिकच्या तयारीमध्ये अडथळा निर्माण होत होता.
जुन्या मशीनमुळे ती त्रस्त झाली होती. मनूने हरियाणातील आपल्या गोरिया गावातून बोलताना सांगितले की, ‘मी अलीकडेच सरावासाठी आपल्या घरी मशीन (इलेक्ट्रॉनिक टार्गेट सिस्टीम) लावली आहे. माझ्या सरावासाठी ही मशीन उपयुक्त ठरत आहे. ’
भाकरने भारतीय क्रीडा प्राधिकरण व आॅलिम्पिक गोल्ड क्वेस्टचे आभार मानले. कारण त्यांनी शक्य तेवढ्या लवकर मशीन मिळवून देण्यास मदत केली. कोविड-१९ महामारीमुळे देशभर लॉकडाऊन असतानाही नवी मशीन तिच्या घरी लवकर पोहोचली.
दरम्यान, कोविड-१९ मुळे जगभरात क्रीडा स्पर्धांबाबत साशंकता आहे. सध्यातरी कोरोनावर नियंत्रण मिळविता आलेले नाही. त्यामुळे पुढील वर्षीही आॅलिम्पिकच्या आयोजनाबाबत साशंकता आहे.
आयएसएसएफ विश्वकप, राष्ट्रकुल स्पर्धा आणि युथ आॅलिम्पिकची पदकविजेता मनू म्हणाली, ‘आॅलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय नेमबाज चांगल्या फॉर्ममध्ये होते, पण स्वास्थ्य अधिक महत्त्वाचे आहे. पुढील वर्षी आॅलिम्पिकचे आयोजन नक्की होईल, याची मला खात्री आहे. मी तोपर्यंत आपला फॉर्म कायम राखणार असून त्यावेळी सर्वोच्च फॉर्मात राहीन. हा जगासाठी कठीण समय आहे, पण मी नकारात्मक विचार करीत नाही. मी मानसिकदृष्ट्या सज्ज आहे.’
१८ वर्षीय ही नेमबाज म्हणाली, ‘जुन्या मशीनमुळे मी त्रस्त झाले होते. कारण ती मॅन्युअल होती. तिचा दोरा निघून जात होता आणि वारंवार तुटत होता. पण, या नव्या मशीनमध्ये वेगळे तंत्र आहे. सध्या तीन-चार महिने कुठलीही स्पर्धा होणार नसल्यामुळे ही मशीन यावेळी लावणे उपयुक्त ठरेल.’ मनूला पुढील वर्षी आॅलिम्पिक आयोजनाची आशा आहे. त्यासाठी ती आपल्या खेळाचा दर्जा कायम राखण्यास प्रयत्नशील आहे.