पुणे, गुजरात संघांमुळे स्पर्धेत नवा उत्साह
By admin | Published: April 20, 2016 03:21 AM2016-04-20T03:21:50+5:302016-04-20T03:21:50+5:30
जीवनात सर्वांत महत्त्वाची बाब आहे आव्हानाला संधी समजण्याची क्षमता असणे. काही चुकीचे घडले तर नकारात्मक विचार मनात घर करतात
जीवनात सर्वांत महत्त्वाची बाब आहे आव्हानाला संधी समजण्याची क्षमता असणे. काही चुकीचे घडले तर नकारात्मक विचार मनात घर करतात. पण, यात काही वेगळे करून मार्ग शोधला तर परिस्थिती सोपी होते आणि सकारात्मक निकाल मिळतात. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास जर एखादा गोलंदाज तुमच्यावर बाऊन्सरचा मारा करीत असेल तर त्या चेंडूला सीमारेषा दाखविण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.
ज्या वेळी आयपीएलचे दोन चॅम्पियन संघ चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली त्या वेळी आयोजक अडचणीत आले होते. पण, आयोजक परिस्थितीला यशस्वीपणे सामोरे गेले आणि चोख प्रत्युत्तर दिले. त्यासाठी त्यांची प्रशंसा करायलाच पाहिजे.
आयपीएलच्या नवव्या पर्वाला जवळजवळ १० दिवस झाले असून, दोन नव्या फ्रॅन्चायसी संघांमुळे स्पर्धेत नवा उत्साह संचारला आहे. रायझिंग पुणे सुपरजायंट्समध्ये चेन्नईची झलक दिसते. धोनीच्या नेतृत्वाखालील कुठलाही संघ नेहमीच तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतो. या संघात अजिंक्य रहाणे, फाफ डू प्लेसिस, केविन पीटरसन, धोनी आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यासारखे अव्वल पाच फलंदाज आहेत, तर गोलंदाजी आक्रमणही संतुलित आहे.
गुजरात लायन्स संघातही जागतिक दर्जाच्या फलंदाजांचा समावेश आहे. अॅरोन फिंच, ब्रँडन मॅक्युलम, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो आणि रवींद्र जडेजा या पाच फलंदाजांनी आपली छाप सोडली आहे. काही दिग्गज फ्रॅन्चायसी संघांनी या स्पर्धेत संथ सुरुवात केली आहे, पण प्रत्येक संघ तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे. ही स्पर्धा म्हणजे स्प्रिंट नसून मॅरेथॉन आहे. येथे सामन्यागणिक तुम्हाला रणनीती तयार करावी
लागते. जो संघ फार पुढचा विचार करतो त्या संघाला त्याची झळ सोसावी लागू शकते.
टी-२० क्रिकेटमध्ये अनुभवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. वेगवान क्रिकेटमध्ये काही चेंडू जय-पराजयातील अंतर स्पष्ट करतात. त्यामुळे प्रत्येक संघाला अडचणीच्या स्थितीत संयम राखून संघाला पैलतीर गाठून देणाऱ्या खेळाडूंची गरज असते. झहीर खान त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्याने २०००मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटपटू म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्याने ९२ कसोटी आणि २०० वन-डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. आता वयाच्या ३७व्या वर्षी तो दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी चांगला कर्णधार ठरत आहे.
आरसीबीचा विचार करता आम्ही ‘झहीर अॅण्ड कंपनी’विरुद्ध पराभूत झाल्यामुळे निराश झालो आहोत,
पण आयपीएलच्या नवव्या पर्वात यशस्वी ठरण्यासाठी कशाची गरज आहे, याची आम्हाला चांगली कल्पना आहे.(टीसीएम)