नवे वर्ष... नवा जोश

By admin | Published: January 6, 2015 01:40 AM2015-01-06T01:40:37+5:302015-01-06T01:40:37+5:30

सौरव गांगुलीने टीम इंडियाला प्रतिस्पर्ध्यांच्या नजरेला नजर भिडवीत प्रत्युत्तर देण्याचे शिकविले... महेंद्रसिंह धोनीने संघाला कामगिरीत सातत्य राखण्याचे शिकविले...

New Year ... New Josh | नवे वर्ष... नवा जोश

नवे वर्ष... नवा जोश

Next

आॅस्ट्रेलियाविरुद्ध चौथी कसोटी आजपासून : कोहलीच्या नेतृत्वात भारत विजयासाठी उत्सुक
सिडनी : सौरव गांगुलीने टीम इंडियाला प्रतिस्पर्ध्यांच्या नजरेला नजर भिडवीत प्रत्युत्तर देण्याचे शिकविले... महेंद्रसिंह धोनीने संघाला कामगिरीत सातत्य राखण्याचे शिकविले... आक्रमक विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला विदेशात चमकदार कामगिरी करणे साध्य होईल का, भारतीय संघ आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत प्रतिष्ठा राखणारा विजय मिळविणार का, याबाबत उत्सुकता आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका गमाविली असली, तरी भारतीय संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली नव्या वर्षाची सुरुवात विजयाने करण्यास उत्सुक आहे. नवे वर्ष... नवा जोश...त्यात भारतीय संघ विजयाला गवसणी घालणार का? असा प्रश्न तमान क्रिकेट चाहत्यांना भेडसावत आहे. निमित्त आहे मंगळवारपासून आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील खेळल्या जाणाऱ्या चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्याचे.
मालिकेत ०-२ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गमावलेली आहे. याव्यतिरिक्त मेलबोर्नमध्ये अनिर्णित संपलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर कोहलीकडे संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले. मालिकेत तीन शतके ठोकणारा आक्रमक फलंदाज संघाच्या कर्णधारपदाचे दडपण झुगारत संघाची प्रतिष्ठा राखण्यात यशस्वी ठरतो किंवा नाही, याबाबत क्रिकेट वर्तुळात उत्सुकता आहे.
कोहलीने जवळजवळ महिनाभरापूर्वी अ‍ॅडिलेड ओव्हलमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात नेतृत्व करताना चमकदार कामगिरी केली होती. त्याने दोन्ही डावांत शतकी खेळी करीत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले होते; पण त्यानंतरही संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. कोहलीपुढे आता वेगळ्या प्रकारचे आव्हान आहे. वरुण अ‍ॅरोन संघात परतला असून, भुवनेश्वर कुमारने नेटमध्ये चांगली गोलंदाजी केली. ईशांतने सराव केला नाही, पण तो सरावादरम्यान उपस्थित होता. उमेश यादव, मोहम्मद शमी व धवल कुळकर्णी यांनी गोलंदाजी व फलंदाजीचा सराव केला. अश्विन, कर्ण शर्मा व अक्षर पटेल यांनीही आज सराव केला. सर्व खेळाडू फिट राहतील व निवडीसाठी उपलब्ध राहतील, याची नवा कर्णधार दक्षता घेत आहे. आॅस्ट्रेलियन ड्रेसिंग रूमबाहेर फिलिप ह्युजच्या आठवणीची पट्टी लावण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात स्थानिक सामन्यादरम्यान बाऊंसर डोक्यावर आदळून ह्युजचा मृत्यू झाला होता. (वृत्तसंस्था)


आॅस्ट्रेलियन संघाला जॉन्सनची उणीव भासणार आहे. कर्णधार स्मिथने विजय मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

सिडनी : विराट कोहली हा भावुक व्यक्ती आहे. चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत प्रतिस्पर्धी संघाचे नेतृत्व करणाऱ्या या कर्णधाराविरुद्ध लढण्यास सज्ज असल्याचे आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याचे मत आहे. सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत स्मिथ म्हणाला,की धोनी दीर्घकाळ भारतासाठी शानदार कर्णधार राहिला, यात शंका नाही. आम्ही विराटला आधीच्या कसोटीत नेतृत्व करताना पाहिले. तो भावुक असून, चर्चेत राहू इच्छितो. या आठवड्यात पुन्हा एकदा विराटविरुद्ध लढत द्यायला आवडेल. या मालिकेची अखेर विजयात करू, अशी आशा आहे.

४विदेशात भारताने सलग सहावी मालिका गमाविली. याची सुरुवात २०११ च्या इंग्लंड दौऱ्यापासून झाली. भारताच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच संघाला प्रदीर्घ काळ विदेशात पराभवाला सामोरे जावे लागले. यापूर्वी १९३२ च्या पदार्पणाच्या मालिकेपासून १९५५ च्या वेस्ट इंडीजच्या पहिल्या दौऱ्यापर्यंत संघाला सातत्याने पराभव स्वीकारावा लागला होता.
४गेल्या काही वर्षांत भारतीय गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघाला दोनदा गारद करण्यात अपयश आले. त्यामुळे कोहलीला सर्वप्रथम २० बळी घेण्याची क्षमता असलेल्या गोलंदाजांची निवड करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. सिडनी कसोटीनंतर भारताला बरेच दिवस कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळणार नाही. यानंतर भारताला बांगलादेश दौऱ्यात कसोटी सामना खेळायचा आहे.



हा दौरा आयपीएनंतर होणार आहे. त्यामुळे कोहलीला सध्यातरी मंगळवारपासून खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यासाठी गोलंदाजी आक्रमणावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. आगामी तिरंगी मालिका व विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कुठल्या खेळाडूंना विश्रांती द्यायची व कुठल्या खेळाडूंना संधी द्यायची, याचा कोहलीला निर्णय घ्यावा लागणार आहे. भारतीय संघ पाच गोलंदाजांना संधी देणार नसल्याचे जवळजवळ निश्चित असून, धोनीच्या स्थानी रिद्धिमान साहाला यष्टिरक्षकाची भूमिका बजवावी लागणार आहे.



प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना, रिद्धमान साहा, रविचंद्रन अश्विन, कर्ण शर्मा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, वरुण अ‍ॅरोन, उमेश यादव, धवल कुलकर्णी, केएल राहुल, महेंद्रसिंह धोनी (राखीव).
आॅस्ट्रेलिया : स्टिव स्मिथ (कर्णधार), डेविड वार्नर, ख्रिस रॉजर्स, शेन वॉटसन, शॉन मार्श, जो बर्न्स, ब्रॅड हॅडिन, रॅन हैरिस, मिशेल स्टार्क, नॅथन लियोन व जोश हेजलवुड.

या मैदानावर भारताने १० कसोटी सामने खेळले असून, १९७८मध्ये भारताला एकमेव विजय मिळविता आला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला आतापर्यंत दोन्ही सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला.

जॉन्सनच्या स्थानी स्टार्क
सिडनी : आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉन्सनने दुखापतीमुळे चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली असून, त्याच्या स्थानी संघात मिशेल स्टार्कचा समावेश करण्यात आला. या मालिकेत आॅस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेला जॉन्सनला स्नायूच्या दुखापतीने सतावले आहे. आगामी विश्वकप स्पर्धेत व भारत व इंग्लंड यांचा समावेश असलेल्या तिरंगी मालिकेच्या पार्श्वभूमीवर जॉन्सनला विश्रांती देण्यात आली आहे.

Web Title: New Year ... New Josh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.