नवे वर्ष-नवे पर्व...!
By admin | Published: December 31, 2014 11:50 PM2014-12-31T23:50:16+5:302014-12-31T23:50:16+5:30
महेंद्रसिंग धोनीने कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच टीम इंडियात अनुभवी असा कुठलाही खेळाडू राहिलेला नाही.
टीम इंडिया : धोनीनंतर ईशांत शर्मा हाच एकमेव दीर्घानुभवी
नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच टीम इंडियात अनुभवी असा कुठलाही खेळाडू राहिलेला नाही.
३२ सामन्यांचा अनुभव असलेला विराट कोहली हा नेतृत्व करणार असेल तरी ६१ सामने खेळलेला ईशांत शर्मा
हा एकमेव खेळाडू त्याच्याहून
मुरब्बी ठरतो.
धोनी ९० सामने खेळलेला एकमेव दिग्गज होता. सचिन, द्रविड, लक्ष्मण, गांगुली, सेहवाग, गंभीर, जहीर, युवराज आणि हरभजन हे कसोटी क्रिकेटपासून दूर गेले आहेत. आता धोनीही गेला तेव्हा ईशांत शर्मा हाच एकमेव दीर्घानुभवी उरला. त्याला विराटच्या नेतृत्वात खेळायचे असल्याने टीम इंडियाचे नव्या वर्षात नवे पर्व सुरू होईल. ६ जानेवारीपासून सिडनीत सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत कोहलीकडे नेतृत्वाची धुरा राहणार आहे.
अन्य खेळाडूंवर नजर टाकल्यास त्यात मुरली विजय ३०, चेतेश्वर पूजारा २७, रविचंद्रन अश्विन २३ आणि सलामीचा शिखर धवन हा १३ कसोटी सामने खेळला आहे. अजिंक्य रहाणे १३, मोहम्मद शमी ११ आणि उमेश यादवदेखील ११ सामने खेळला. रोहित शर्मा याने नऊ, वरुण अॅरोनने पाच आणि यष्टिरक्षक रिद्धिमान साहा तीन सामने खेळला. या मालिकेत पदार्पण करणारे कर्ण शर्मा आणि राहुल लोकेश यांच्याकडे केवळ एका सामन्याचा अनुभव आहे.
जखमी होताच मालिकेबाहेर झालेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ११ आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा याने १२ तर डावखुरा गोलंदाज सुरेश रैना याला १७ सामने खेळल्याचा अनुभव आहे. अर्थात सिडनी येथे जो संघ उतरेल तो आंतरराष्ट्रीय स्तरावर अनुभवहीन असेल. पण याच संघाला भारताचे कसोटी क्रिकेट पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारावी लागणार
आहे. (वृत्तसंस्था)
कॅप्टन ‘कूल’ची निवृत्तीही ‘कूल’!
नवी दिल्ली : या शहरात फिरोजशाह कोटला मैदानावर २००८ साली अनिल कुंबळेने निवृत्ती जाहीर केली तेव्हा त्याला आपल्या खांद्यावर बसवून सहकाऱ्यांसह एका खेळाडूने अर्ध्या मैदानाला वेढा घातला होता. तो होता महेंद्रसिंग धोनी. नंतर त्याने नेतृत्वाची धुरा सांभाळली आणि ६० सामन्यात कर्णधारपद भूषविल्यानंतर तडकाफडकी कसोटी क्रिकेटला अलविदाही केले.
हा निर्णय घेतेवेळी त्याने कसोटीचे शतक गाठण्याचा आणि यष्टीमागे ३०० बळी पूर्ण करण्याचा मोह बाळगला नाही. हा निर्णय थंड डोक्याने केला असेच म्हणावे लागेल. यामागे बीसीसीआयचा दबाव असावा. रवी शास्त्री आणि विराट कोहली यांचा अडथळा वाटत असावा किंवा विदेशात सलग पराभवामुळे तो खचला असावा, असा कयास लावला जात आहे. तथापि धोनीने साहसी निर्णय घेतला तसेच हा निर्णय बीसीसीआय सचिव संजय पटेल यांना विनम्रपणे कळविला होता.
४तो दोन-तीन वर्षे आणखी खेळू शकला असता. कर्णधारपद सोडले असते आणि यष्टिरक्षक म्हणून संघात कायम राहिला असता तरी चालले असते. पण धोनी हा शब्दावर कायम राहणारा आहे. त्यासाठी टीका झाली तरी डगमगत नाही. त्यामुळेच निवृत्ती जाहीर करतेवेळी टीकाकार काय म्हणतील याचीही त्याने पर्वा केली नाही. ‘मी टेस्ट क्रिकेटला अलविदा करीत आहे आणि माझा हा निर्णय अंतिम असल्याचे त्याने पत्रपरिषदेतही ठासून सांगितले होते.’
असाही योगायोग!
महेंद्रसिंग धोनीच्या कारकीर्दीत ४८ या आकड्याला मोठे महत्त्व राहिले आहे.
धोनीचे नाव इंग्रजी वर्णमालेनुसार डी पासून सुरू होते आणि चौथ्या क्रमांकावर एच येतो. डीएच म्हणजे ४८...
धोनीच्या पहिल्या कसोटी शतकात १४८ धावा होत्या. पहिल्या वन डे शतकातही १४८ धावाच होत्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च खेळी ४८ आहे...
धोनीच्या सर्वोच्च कसोटी धावा २२४ आहेत. या आकड्यातील पहिल्या दोन ने नंतरच्या २४ ला गुणल्यास बेरीज होते ४८...
धोनीने अखेरच्या कसोटी डावात २४ धावा केल्या. ही संख्या ४८ ची आधारसंख्या आहे. २४ धावांवर क्रिकेटला अलविदा करणारा धोनी शुद्ध २४ कॅरेट सोन्यासारखा चकाकणारा खेळाडू ठरला.