विजेतेपदाने करणार नव्या वर्षाची सुरुवात - जोकोविच
By admin | Published: January 3, 2016 01:32 AM2016-01-03T01:32:24+5:302016-01-03T01:32:24+5:30
वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा आॅस्टे्रलियन ओपनसाठी स्वत:ला आजमवण्यासाठी सोमवारपासून सुरू होणाऱ्या कतार ओपन स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोव्हिच खेळेल.
दोहा : वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा आॅस्टे्रलियन ओपनसाठी स्वत:ला आजमवण्यासाठी सोमवारपासून सुरू होणाऱ्या कतार ओपन स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नोव्हाक जोकोव्हिच खेळेल. या स्पर्धेत जोकोसह इतर नामांकित खेळाडूही सहभागी होणार असल्याने यंदाच्या मोसमातील सुरुवातीला जागतिक टेनिसचा धडाका पाहायला मिळेल.
आॅस्टे्रलियन ओपनची पूर्वतयारी म्हणून जोको कतार ओपनमध्ये विजेतेपदासाठी खेळेल. त्याचवेळी स्पेनचा बलाढ्य खेळाडू राफेल नदाल, टॉमस बेर्दीच आणि डेव्हीड फेरर यांसारखे मातब्बर खेळाडूही या स्पर्धेत खेळणार असल्याने जोकोसमोर खडतर आव्हान असेल. तरीदेखील गतवर्षी विजेतेपदांचा धडाका लावलेल्या जोकोच्या कामगिरीवर टेनिसप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळेच जोको यंदाच्या मोसमाची सुरुवात विजयाने करतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
गेल्या वर्षी जोकोला करियर स्लॅम नोंदवण्याची सुवर्णसंधी होती. तुफान फॉर्ममध्ये असलेल्या जोकोने गतवर्षी आॅस्टे्रलियन, विम्बल्डन आणि यूएस ओपन विजेतेपदांवर कब्जा केला होता. फ्रेंच ओपनच्या फायनलमध्येही जोकोने धडक मारली होती. मात्र या स्पर्धेत त्याला स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाने धक्का दिला होता. या दिमाखदार कामगिरीसह जोको चारही ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा टेनिस इतिहासातील तिसरा खेळाडू ठरला होता. २०१६ साली यशस्वी कामगिरी करण्यासाठी मी पूर्ण सज्ज असल्याचे सांगून प्रतिस्पर्धी खेळाडूंना त्यानेही एकप्रकारचा इशाराच दिला आहे. गतवर्षी नदाल आपल्या कारकिर्दीत प्रथमच १०व्या स्थानी फेकला होता. त्याची आतापर्यंतची सर्वांत
खराब कामगिरी ठरली. (वृत्तसंस्था)
चार ग्रँडस्लॅमचा निर्धार....
मेलबर्न येथे १८ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आॅस्टे्रलियन ओपनसाठी जोको विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. त्याचबरोबर जागतिक क्रमवारीतील या अव्वल खेळाडूचा यंदा चारही ग्रँडस्लॅम पटकावण्याचा निर्धार असेल.
जोकोविच कामगिरी करण्यास यशस्वी ठरला तर तो रॉड लेवरनंतरचा पहिला खेळाडू ठरेल. लेवरने १९६९मध्ये चारही विजेतेपद पटकावले होते. यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण पटकावण्याचा प्रयत्नही जोकोकडून होईल.
नवा मोसम सुरू
होत असून, कोर्टवर परतल्याने मी खूप उत्साहित झालो आहे. मोसमातील पहिल्याच स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याचा माझा पूर्ण प्रयत्न असेल.
- नोव्हाक जोकोविच, सर्बिया