न्यूझीलंड-बांगलादेशसाठी ‘करा किंवा मरा’ लढत
By admin | Published: June 9, 2017 04:03 AM2017-06-09T04:03:14+5:302017-06-09T04:03:41+5:30
न्यूझीलंड आणि बांगलादेश संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अखेरच्या लढतीत आज शुक्रवारी ‘करा किंवा मरा’ या इराद्याने खेळणार आहेत
कार्डिफ : न्यूझीलंड आणि बांगलादेश संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अखेरच्या लढतीत आज शुक्रवारी ‘करा किंवा मरा’ या इराद्याने खेळणार आहेत. या सामन्यात बाजी मारणारा संघ ‘अ’ गटातून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे.
गुणतालिकेत न्यूझीलंड चौथ्या तसेच बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे. उभय संघांचा प्रत्येकी एक गुण आहे. दोघांना इंग्लंडने पराभवाची चव चाखविली तर आॅस्ट्रेलियाविरुद्ध पावसामुळे दोन्ही संघांना एका गुणावर समाधान मानावे लागेल. यजमान इंग्लंडने दोन सहज विजयांसह उपांत्य फेरीत आधीच धडक दिली आहे. आॅस्ट्रेलियाने अखेरच्या साखळी सामन्यात इंग्लंडला नमविल्यास हा संघ देखील उपांत्य फेरीचा दावेदार होऊ शकतो. न्यूझीलंड आणि बांगलादेश या संघांना विजय मिळविण्यासोबतच आॅस्ट्रेलियाच्या इंग्लंडवरील विजयासाठी प्रार्थना करावी लागेल. दरम्यान पाऊस समीकरणे बिघडवू शकतो.
न्यूझीलंड संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध अपयशी ठरला. चांगली स्थिती असताना पावसामुळे गुणविभागणीवर समाधान मानावे लागले. बांगलादेश मात्र पावसामुळे आॅस्ट्रेलियाकडून पराभूत होता होता बचावला. न्यूझीलंडचे पारडे सामन्यात जड वाटत असले तरी बांगलादेशला सहज घेता येणार नाही. अलीकडे मर्यादित षटकांच्या सामन्यात त्यांनी कमाल केली आहे. कर्णधार केन विलियम्सन याच्या कामगिरीवर न्यूझीलंडची भिस्त असेल.(वृत्तसंस्था)
उभय संघ यातून निवडणार
न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार ), कोरी अॅण्डरसन, ट्रेंट बोल्ट, नील ब्रूम, कोलिन डी ग्रॅण्डहोम, मार्टिन गुप्तिल, टॉम लेथम, मिशेल मॅक्लेनघन, अॅडम मिल्ने, जेम्स नीशाम, जीतन पटेल, ल्यूक रोंची, मिशेल सेंटनर, टिम साउदी आणि रॉस टेलर.
बांगलादेश: मूशर्रफ मुर्तजा (कर्णधार), शाकिब अल हसन, मुशकिफूर रहमान, तमीम इक्बाल, मोहम्मद महमदुल्लाह, शब्बीर रहमान, रुबेल हुसेन, सौम्या सरकार, तास्किन अहमद, मुस्तफिजूर रहमान, इमरुल कायेस, मेहदी हसन, मोसादेक हुसेन, सुंजामुल इस्लाम आणि शफीउल इस्लाम.