कोटलावर न्यूझीलंडच्या फलंदाजांचे वर्चस्व
By admin | Published: September 17, 2016 05:20 AM2016-09-17T05:20:50+5:302016-09-17T05:20:50+5:30
टॉम लॅथम (५५) व कर्णधार केन विल्यम्सन (५०) यांनी झळकावलेल्या वैयक्तिक अर्धशतकानंतर पाहुण्या न्यूझीलंड संघाने रणजी चॅम्पियन मुंबईविरुद्ध शुक्रवारपासून प्रारंभ
नवी दिल्ली : टॉम लॅथम (५५) व कर्णधार केन विल्यम्सन (५०) यांनी झळकावलेल्या वैयक्तिक अर्धशतकानंतर पाहुण्या न्यूझीलंड संघाने रणजी चॅम्पियन मुंबईविरुद्ध शुक्रवारपासून प्रारंभ झालेल्या तीनदिवसीय सराव सामन्यात पहिल्या दिवशी पहिला डाव ७ बाद ३२४ धावसंख्येवर घोषित केला.
भारताविरुद्ध २२ आॅक्टोबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये प्रारंभ होत असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज असलेल्या किवी फलंदाजांनी शुक्रवारी फिरोजशाह कोटला मैदानावर दमदार फलंदाजी केली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ७५ षटकांत ७ बाद ३२४ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात खेळताना दिवसअखेर मुंबई संघाची १३ षटकांत १ बाद २९ अशी स्थिती होती. मुंबईला न्यूझीलंडची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप २९५ धावांची गरज असून त्यांच्या ९ विकेट शिल्लक आहेत. आजचा खेळ थांबला कौस्तुभ पवार (५) आणि अरमान जाफर (२४) खेळपट्टीवर होते. जय विस्ता (०) खाते न उघडताच माघारी परतला. त्याला ट्रेन्ट बोल्टने माघारी परतवले.
रणजी चॅम्पियन मुंबई संघात भारतीय फलंदाज रोहित शर्माचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी शिखर धवनच्या साथीने रोहितवर निवड समितीने विश्वास दर्शविला आहे. मालिकेच्या तयारीच्या दृष्टीने रोहितसाठी हा सराव सामना महत्त्वाचा मानला जात आहे.
त्याआधी, न्यूझीलंडची पहिल्या डावात सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर मार्टिन गुप्टिल (१५) झटपट माघारी परतला. त्याला बलविंदर संधूने माघारी परतवले. त्यानंतर टॉम लॅथम आणि कर्णधार विल्यम्सन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. टॉमने ९७ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकार व १ षटकार ठोकला, तर विल्यम्सनने ५६ चेंडूंमध्ये ६ चौकार व २ षटकार लगावले.
धावफलक :
न्यूझीलंड पहिला डाव : गुप्टिल झे. तारे गो. संधू १५, लॅथम रिटायर्ड हर्ट ५५, विल्यम्सन झे. तारे गो. संधू ५०, टेलर पायचित गो. गोहिल ४१, निकोल्स पायचित गो. लाड २९, वॉटलिंग रिटायर्ड हर्ट २१, सँटेनर झे. गोहिल गो. दाभोळकर ४५, क्रेग नाबाद ३३, सोढी नाबाद २९. अवांतर : ६. एकूण : ७५ षटकांत ७ बाद ३२४. गडी बाद क्रम : १-३०, २-११५, ३-१५१, ४-१८४, ५-२१०, ६-२३५, ७-२८१. गोलंदाजी : संधू ११-५-२१-२, देशपांडे ५-०-२९-०, दाभोळकर १४-०-७५-१, डायस ६-२-२०-०, वालसंगकर ९-१४६-०, सोनी ४-०-२१-०, गोहिल १३-१-५८-१, लाड ९-१-३४-१, बिस्टा ४-०-१७-०.
मुंबई पहिला डाव :- बिस्टा झे. वॉटलिंग गो. बोल्ट ००, पवार खेळत आहे ५, जाफर खेळत आहे २४. एकूण : १३ षटकांत १ बाद २९. गडी बाद क्रम : १-०. गोलंदाजी : वँगनर ४-२-३-०, सँटेनर ४-१-१०-०, ब्रेसवेल २-०-११-०. बोल्ट ३-२-५-१.
कुठल्याही खेळपट्टीवर खेळण्यास तयार : टॉम लॅथम
मुंबईविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सराव सामन्याच्या तुलनेत पहिल्या कसोटी सामन्यात परिस्थिती वेगळी राहणार असल्याची न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज टॉम लॅथमला कल्पना आहे. सराव सामन्यात आमच्यासाठी सर्व बाबी सकारात्मक घडल्या
असून जास्तीत जास्त फलंदाजांना खेळपट्टीवर वेळ घालविण्याची संधी मिळाली, अशी प्रतिक्रिया लॅथमने सराव सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर दिली.
कोटलाच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी चेंडू अधिक वळत नव्हता, पण कानपूरमध्ये २२ सप्टेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळपट्टी फिरकीला अनुकूल राहण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी ५५ धावांची खेळी करणारा लॅथम म्हणाला, ‘‘कसोटी मालिकेतील परिस्थितीबाबत चिंता करण्यात काही अर्थ नाही.’’
लॅथमने आतापर्यंत २२ सामने खेळले आहेत, पण भारतात त्याने अद्याप एकही कसोटी सामना खेळलेला नाही.
लॅथम म्हणाला, ‘‘कसोटी मालिकेत खेळपट्ट्यांचे आव्हान पेलण्यास आम्ही सज्ज आहोत. सराव सामन्याच्यानिमित्ताने आम्हाला येथील परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची संधी मिळाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात खेळपट्टी फिरकीला अनुकूल राहणार असली तरी सराव सामन्यातील कामगिरीचा आम्हाला नक्की लाभ होईल. वातावरणासोबत जुळवून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.’’