न्यूझीलंडचा बांगलादेशवर मालिका विजय
By admin | Published: January 7, 2017 04:31 AM2017-01-07T04:31:37+5:302017-01-07T04:31:37+5:30
न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात बांगला देशचा ४७ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी मिळविली.
माऊंट मोउंगानी : कोलिन मुन्रोच्या ५४ चेंडूंतील (१०१ धावा) शतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात बांगला देशचा ४७ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी मिळविली. याआधी यजमानांनी वन-डे मालिका ३-०ने जिंकली होती.
मुन्रो याने आपल्या खेळीत सात षट्कार आणि सात चौकारांसह शतक ठोकून न्यूझीलंडला ७ बाद १९५ पर्यंत मजल गाठून दिली. बांगला देशचा डाव १९ षटकांत १४८ धावांत आटोपला.
बांगलादेशने ३६ धावांत सुरुवातीचे तिन्ही फलंंदाज गमविले होते. शब्बीर रहमान आणि सौम्या सरकार यांनी ४० चेंडूंत ६८ धावांची भागीदारी करीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना घाम फोडला होता. यानंतर कोलिन डे ग्राण्डहोमच्या एकाच षटकांत २१ धावा निघाल्याने बांगलादेशने विजयाकडे वाटचाल सुरु केली होती. पण, बांगलादेशचे सात फलंदाज अवघ्या ४४ धावांत बाद होताच त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. ट्रेन्ट बोल्ट याने सौम्याला ३९ धावांवर बाद केले. शब्बीरचा (४६) बळी ईश सोढी याने घेतला. न्यूझीलंडकडून ब्रूस आणि मुन्रो यांनी पाचव्या गड्यासाठी ६७ चेंडूंत केलेली १२३ धावांची भागीदारी सामन्यात निर्णायक ठरली. (वृत्तसंस्था)