न्यूझीलंडची उपांत्य फेरीत धडक, पाकिस्तानचे आव्हान जवळपास संपुष्टात
By admin | Published: March 22, 2016 11:03 PM2016-03-22T23:03:32+5:302016-03-22T23:03:32+5:30
मार्टिन गुप्टीलचे (८०) तडाखेबंद अर्धशतक आणि सॅनटर-मिल्ने यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने टी२० विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित करत पाकिस्तानला २२ धावांनी लोळवले.
ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. २२ - सलामीवीर मार्टिन गुप्टीलचे (८०) तडाखेबंद अर्धशतक आणि मिशेल सॅनटर - अॅडम मिल्ने यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने टी२० विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी निश्चित करत पाकिस्तानला २२ धावांनी लोळवले. यासह पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने निर्धारीत षटकांत ५ बाद १८० धावांची आव्हानात्मक मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना पाकने ५ बाद १५८ धावा काढल्या. शारजील खान (४७) व अहमद शेहजाद (३०) यांनी आक्रमक ६५ धावांची भागीदारी करुन पाकिस्तानला शानदार सुरुवात करुन दिली. मात्र हे दोघेही बाद झाल्यानंतर पाकिस्तानवर दडपण वाढले आणि इतर फलंदाज संघाला विजयी करण्यापासून अपयशी ठरले. उमर अकमलने २४ धावांची संयमी खेळी करुन पाकच्या आशा कायम राखल्या. मात्र दडपणाखाली तो देखील अपयशी ठरला. सॅनटर व मिल्ने यांनी प्रत्येकी २ बळी घेत पाकला रोखण्यात मोलाचे योगदान दिले.
तत्पूर्वी, गुप्टीलने कर्णधार केन विलियम्सनसह संघाला अर्धशतकी सलामी दिली. विलियम्सन व कॉलिन मुन्रो लवकर परतल्याने किवींचा डाव नवव्या षटकांत २ बाद ७५ असा घसरला. यानंतर गुप्टीलने कोरी अँडरसनसह ५२ धावांची भागीदारी केली. मोहम्मद सामीने गुप्टीलला त्रिफळाचीत करुन ही जोडी फोडली. गुप्टीलने ४८ चेंडूत १० चौकार व ३ षटकारांसह ८० धावांचा तडाखा दिला. अँडरसन (१४ चेंडूत २१ धावा) व रॉस टेलर (२३ चेंडूत नाबाद ३६) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे किवीला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. मोहम्मद सामी व
शाहिद आफ्रिदी यांनी प्रत्येकी २ बळी घेत चांगला मारा केला. (वृत्तसंस्था)
........................................
संक्षिप्त धावफलक :
न्यूझीलंड : २० षटकांत ५ बाद १८० धावा (मार्टिन गुप्टील ८०, रॉस टेलर नाबाद ३६, कोरी अँडरसन २१; मोहम्मद सामी २/२३, शाहिद आफ्रिदी २/४०) वि.वि. पाकिस्तान : २० षटकांत ५ बाद १५८ धावा (शारजील खान ४७, अहमद शहजाद ३०; अॅडम मिल्ने २/२६, मिशेल सॅनटर २/२९)