दुसऱ्या विजयास न्यूझीलंड सज्ज
By admin | Published: March 18, 2016 03:39 AM2016-03-18T03:39:58+5:302016-03-18T03:39:58+5:30
भारताचा दारुण पराभव केल्याने आत्मविश्वास बळावलेला न्यूझीलंड संघ टी-२० विश्वचषकाच्या शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियाला देखील धक्का देण्यास सज्ज आहे.
धरमशाला : भारताचा दारुण पराभव केल्याने आत्मविश्वास बळावलेला न्यूझीलंड संघ टी-२० विश्वचषकाच्या शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियाला देखील धक्का देण्यास सज्ज आहे.
पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले दोन्ही संघ पहिल्या टी-२० विश्वविजेतेपदासाठी आतूर आहेत. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांना संकटाचा सामना करावा लागला पण गोलंदाजांनी सामना जिंकून दिला. ईश सोढी, मिशेल सॅन्टनर,आणि नाथन मॅक्यूलम या तिन्ही फिरकी गोलंदाजांनी भारताची फलंदाजी गुंडाळून १२६ धावांचा यशस्वी बचाव केला होता. ४७ धावांनी सामना जिंकून न्यूझीलंडने इतर संघांच्या मनात धडकी भरविली आहे. एचपीसीएची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असेल तर केन विलियम्सन पुन्हा एकदा फिरकी त्रिकूटाला संधी देऊ शकतो. भारताविरुद्ध टिम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट या वेगवान गोलंदाजांना बाहेर ठेवण्याचा साहसी निर्णय त्याने घेतला होता.
वानखेडेवरील सराव सामन्यात न्यूझीलंडच्या फिरकीने आॅस्ट्रेलियाला बरेच चकविले होते. अनुभवी शेन वॉटसनने तर ‘अविश्वसनीय’ मारा असे संबोधले होते.
दोन्ही संघ २००५ पासून केवळ चार सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळले. त्यात न्यूझीलनडने २०१० मध्ये सुपर ओव्हरपर्यंत रंगलेला सामना जिंकला तर आॅस्ट्रेलियाने तीन सामन्यात विजय मिळविला आहे. आॅस्ट्रेलियाला अलीकडे एकही टी-२० सामना जिंकता आला नाही. २०१५ पासून हा संघ सात टी-२० सामने खेळला आहे. भारत आणि द. आफ्रिकेविरुद्ध संघ निवडताना आॅस्ट्रेलियाची चांगलीच डोकेदुखी झाली होती. तरीही उत्कृष्ट अकरा खेळाडूंचा शोध कायम आहेच. (वृत्तसंस्था)
न्यूझीलंड : केन विलियम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्तिल, हेन्री निकोलस, ल्यूक रोंची, रॉस टेलर, कोलिन मुन्रो, मिशेल सॅन्टनर, नाथन मॅक्यूलम, ग्रांट इलियट, मिशेल मॅक्लाघन, टिम साऊदी, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, ईश सोढी आणि कोरी अॅण्डरसन.
आॅस्ट्रेलिया : स्टीवन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, एश्टन एगर, नाथन कोल्टर-नील, जेम्स फॉल्कनर, अॅरोन फिंच, जॉन हेस्टिंग्स, जोश हेजलवूड, उस्मान ख्वाजा, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, पीटर नेव्हिल, अॅन्ड्रयू टाय, शेन वॉटसन, अॅडम जाम्पा.
सामन्याची वेळ
दुपारी ३.०० पासून
स्थळ : एचपीसीए स्टेडियम, धरमशाला