न्यूझीलंडचा मालिका विजय
By admin | Published: August 11, 2016 04:47 AM2016-08-11T04:47:54+5:302016-08-11T04:47:54+5:30
इश सोढी आणि मार्टिन गुप्टिल या फिरकी गोलंदाजांनी अचूक मारा करताना घेतलेल्या प्रत्येकी ३ बळीच्या जोरावर बलाढ्य न्यूझीलंडने यजमान झिम्बाब्वेचा दुसरा डाव अवघ्या १३२ धावांत उखाडला
बुलावयो : इश सोढी आणि मार्टिन गुप्टिल या फिरकी गोलंदाजांनी अचूक मारा करताना घेतलेल्या प्रत्येकी ३ बळीच्या जोरावर बलाढ्य न्यूझीलंडने यजमान झिम्बाब्वेचा दुसरा डाव अवघ्या १३२ धावांत उखाडला. या शानदार कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने तब्बल २५४ धावांनी बाजी मारताना दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी निर्विवादपणे जिंकली.
क्वीन्स स्पोटर््स क्लब मैदानावर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी ३८७ धावांचे कठिण आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची चौथ्या दिवसअखेर ३ बाद ५८ धावा अशी अवस्था झाली. यावेळी झिम्बाब्वेच्या सर्व आशा पहिल्या डावातील शतकवीर क्रेग एर्विनवर अवलंबून होत्या. मात्र तो केवळ २७ धावाच काढू शकला. गुप्टिलने त्याला बाद करुन न्यूझीलंडच्या मार्गातील मुख्य अडसर दूर केला. तर, सलामीवीर टिनो मवोयो (३५), डोनाल्ड तिरिपानो (२२) आणि चामू चिभाभा (२१) यांनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.
झिम्बाब्वेचा अर्धा संघ ११२ धावांत गारद करुन न्यूझीलंडने आपली स्थिती मजबूत केली. गुप्टिलने शानदार मारा करताना ११ धावांत ३ बळी घेतले. तर सोढीने १९ धावांत ३ बळी घेत झिम्बाब्वेचे कंबरडे मोडले. टिम साऊदी, टे्रंट बोल्ट, नील वॅगनर व मिशेल सँटर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. तत्पूर्वी, झिम्बाब्वेला ३६२ धावांत गुडाळल्यानंतर न्यूझीलंडने कर्णधार केन विलियम्सन (नाबाद ६८) व रॉस टेलर (नाबाद ६७) यांच्या जोरावर आपला दुसरा डाव ३६ षटकात २ बाद १६६ धावांवर घोषित केला होता. (वृत्तसंस्था)