न्यूझीलंड संघाचा कसून सराव
By admin | Published: September 15, 2016 01:17 AM2016-09-15T01:17:07+5:302016-09-15T01:17:07+5:30
भारत दौऱ्यात आगामी सहा आठवड्यांमध्ये कुठल्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे, याची न्यूझीलंड संघव्यवस्थापनाला चांगली कल्पना आहे.
नवी दिल्ली : भारत दौऱ्यात आगामी सहा आठवड्यांमध्ये कुठल्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे, याची न्यूझीलंड संघव्यवस्थापनाला चांगली कल्पना आहे. त्यामुळे बुधवारी फिरोजशाह कोटला स्टेडियममध्ये दोन तासांच्या सरावादरम्यान लेग स्पिनर ईश सोढी, आॅफ स्पिनर मार्क क्रेग व डावखुरा फिरकीपटू मिशेल सँटनर या फिरकी त्रिकुटाला बराच वेळ गोलंदाजी करताना बघितल्यानंतर आश्चर्य वाटले नाही.
फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर भारतीय फिरकीपटूंना सामोरे जाणे आव्हान असल्याचे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने कबूल केले आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आपल्या फिरकीपटूंविरुद्ध आणि नेट गोलंदाजांविरुद्ध फलंदाजीचा कसून सराव केला. सरावादरम्यान फिरकीपटूंसाठी वेगळी नेट तयार करण्यात आली होती. सँटनरने सराव सत्राच्या दुसऱ्या तासात गोलंदाजीला सुरुवात केली, तर सोढी व क्रेग यांनी फिरकीपटूंसाठी असलेल्या नेटमध्ये सुरुवातीपासून गोलंदाजी केली. क्रेगने नेटमध्ये नव्या ‘एसजी’ चेंडूने गोलंदाजी केली. त्यामुळे खेळपट्टी जर फिरकीला अनुकूल असेल, तर तो गोलंदाजीची सुरुवात करू शकतो, असे संकेत मिळत आहेत. तीन फिरकीपटूंमध्ये सोढीने सर्वाधिक वेळ गोलंदाजी केली. सँटनर गोलंदाजीला आला तेव्हा त्याच्याकडे जुना चेंडू सोपविण्यात आला.
कर्णधार विल्यम्सनने फलंदाजीचा सराव आटोपल्यानंतर आॅफ स्पिन गोलंदाजी केली, यावरून या मालिकेत फिरकीचे महत्त्व अधिक असल्याचे दिसून आले.
न्यूझीलंडच्या कर्णधाराने ५२ कसोटी सामन्यांत २९ बळी घेतले आहेत. जर खेळपट्टीवर चेंडू अधिक वळत असेल, तर त्याला गोलंदाजी करताना बघितले, तर आश्चर्य वाटायला नको. वेगवान गोलंदाज टीम साउदी व ट्रेंट बोल्ट यांनीही सराव केला, तर डावखुरा वेगवान गोलंदाज नील वॅगनर जुन्या चेंडूने गोलंदाजी करताना दिसला. दरम्यान, कानपूरच्या ग्रीन पार्कवरील खेळपट्टीचे स्वरूप बघता रिव्हर्स स्विंगवर भर देण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)