विश्वचषकात न्यूझीलंडची वियजी सुरुवात

By admin | Published: February 14, 2015 11:24 AM2015-02-14T11:24:48+5:302015-02-14T11:44:45+5:30

विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात यजमान न्यूझीलंडने श्रीलंकेचा ९८ धावांनी पराभव करत विश्वचषकात विजयाचा नारळ फोडला.

New Zealand started the World Cup | विश्वचषकात न्यूझीलंडची वियजी सुरुवात

विश्वचषकात न्यूझीलंडची वियजी सुरुवात

Next

 ऑनलाइन लोकमत 

ख्राईस्टचर्च, दि. १४ - विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात यजमान न्यूझीलंडने श्रीलंकेचा ९८ धावांनी पराभव करत विश्वचषकात विजयाचा नारळ फोडला. न्यूझीलंडने दिलेले ३३२ धावांचे लक्ष्य गाठताना श्रीलंकेचा डाव २३३ धावांवरच आटोपला. 

विश्वचषकात २०१५ चा पहिला सामना शनिवारी यजमान न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात पार पडला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजांसमोर श्रीलंकेच्या गोलंदाजांचा मारा निष्प्रभ ठरला. ब्रेंडन मॅक्यूलम आणि मार्टिन गुप्टील या जोडीने न्यूझीलंडसाठी १०० धावांची भागीदारी केली. मॅक्यूलम ६५ धावांवर असताना श्रीलंकेचा गोलंदाज रंगना हेरथने त्याचा अडथळा दूर केला. गुप्टिलचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. न्यूझीलंडची अवस्था २ बाद १३६ धावा केल्या. यानंतर आलेल्या केन विलियम्सनने ५७ धावा ठोकून न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. रॉस टेलर १४ आणि ग्रांट एलिओट २९ धावांवर बाद झाला. न्यूझीलंडची अवस्था ५ बाद २५८ अशी होती. मात्र त्यानंतर कोरी अँडरसनने लंकेच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले व संघाला ३०० टप्पा ओलांडून दिला. अँडरसन ४६ चेंडूत ७५ धावा करुन बाद झाला. त्याला लुक रोंचीने नाबाद २९ धावांची खेळी करत मोलाची साथ दिली. न्यूझीलंडने ५० षटकांत ३३१ धावा केल्या.श्रीलंकेच्या वतीने सुरंगा लकमल आणि जीवन मेंडिसने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर नुवान कुलसेकरा व रंगना हेरथने प्रत्येकी एक विकेट घेतली. 

गोलंदाज अपयशी ठरल्यावर श्रीलंकेची मदार फलंदाजांवर होती. श्रीलंकेच्या सलामीवीरांनी अर्धशतकी सलमी ठोकत चांगली सुरुवात केली. मात्र श्रीलंकेच्या ६७ धावा झाल्या असताना ट्रेंट बोल्टने सलामीवीर तिलकरत्ने दिलशानची विकेट घेतली. उपकर्णधार लाहीरु थिरीमनेने अर्धशतक ठोकून श्रीलंकेला शंभरी गाठून दिली. पण तो ६५ धावांवर बाद झाला व यानंतर श्रीलंकेची फलंदाजी कोसळली. कुमार संगकारा ३९ धावा व अँजेला मॅथ्यूजच्या ४६ धावांची खेळी वगळता एकही फलंदाज न्यूझीलंडच्या तोफखान्यासमोर तग धरु शकला नाही. श्रीलंकेचा डाव ४६. १ षटकात २३३ धावांवर आटोपला. न्यूझीलंडतर्फे टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, अॅडम मिल्ने, डॅनिएल व्हिटोरी, कोरी अँडरसनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. सामन्यात ७५ धावा आणि दोन विकेट घेणा-या कोरी अँडरसनला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. 

Web Title: New Zealand started the World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.