गुप्तिलच्या शतकाने न्यूझीलंड भक्कम
By admin | Published: December 11, 2015 12:06 AM2015-12-11T00:06:36+5:302015-12-11T00:06:36+5:30
सलामीवीर मार्टिन गुप्तिलचे (१५६ धावा) शानदार शतक, तसेच केन विलियम्सन व कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमच्या अर्धशतकांमुळे न्यूझीलंडने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या
ड्यूनेडिन : सलामीवीर मार्टिन गुप्तिलचे (१५६ धावा) शानदार शतक, तसेच केन विलियम्सन व कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमच्या अर्धशतकांमुळे न्यूझीलंडने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर आठ गड्यांच्या मोबदल्यात ४०९ पर्यंत मजल गाठून स्थिती भक्कम केली.
लंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाहुण्यांचा हा निर्णय चुकीचा ठरविला. गुप्तिलशिवाय केन विलियम्सन ८८ आणि कर्णधार मॅक्यूलम ७५ यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर यजमानांंनी ९० षटकांत ४०९ पर्यंत मजल गाठली. सलामीचा टॉम लॉथम (२२) बाद होताच गुप्तिल-विलियम्सन यांनी दुसऱ्या गड्यासाठी १७३ धावा ठोकल्या. नुवान प्रदीपच्या चेंडूवर करुणारत्नेकडे झेल देण्याआधी विलियम्सनने १२ चौकारांसह ८८ धावा कुटल्या.
करिअरमध्ये तिसरे शतक गाठणाऱ्या गुप्तिलने २३४ चेंडूंत २१ चौकारांसह १५६ धावा केल्या. अँजेलो मॅथ्यूजच्या चेंडूवर चांदीमल याने त्याला यष्टिचीत केले. यानंतर
आलेला कर्णधार मॅक्युलम यानेही
५७ चेंडंूत १३ चौकार आणि
एका षटकारासह ७५ धावांचे
योगदान दिले. मिलिंदा श्रीवर्धने याने त्याला बाद केले. दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी डग ब्रेसवेल नाबाद ३२ आणि नील व्हॅगनर (नाबाद ००) हे खेळत होते. (वृत्तसंस्था)