न्यूझीलंडची सरशी

By admin | Published: December 15, 2015 01:37 AM2015-12-15T01:37:20+5:302015-12-15T01:37:20+5:30

न्यूझीलंडने सोमवारी पाचव्या अखेरच्या दिवशी संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा १२२ धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने श्रीलंकेपुढे विजयासाठी ४०५ धावांचे

New Zealand's glee | न्यूझीलंडची सरशी

न्यूझीलंडची सरशी

Next

ड्युनेडिन : न्यूझीलंडने सोमवारी पाचव्या अखेरच्या दिवशी संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा १२२ धावांनी पराभव केला. न्यूझीलंडने श्रीलंकेपुढे विजयासाठी ४०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. श्रीलंकेकडे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पुरेसा अवधी होता, पण त्यांच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. श्रीलंकेचा दुसरा डाव पाचव्या व अखेरच्या दिवशी उपाहारानंतर २८२ धावांत संपुष्टात आला. श्रीलंकेचे आघाडीचे दोन फलंदाज दिनेश चांदीमल व कर्णधार अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज यांनी सुरुवातीला काही वेळ संघर्षपूर्ण खेळ करीत चौथ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. पण, तीन षटकांच्या अंतरात हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर न्यूझीलंडचा विजयाचा मार्ग प्रशस्त झाला. मॅथ्यूजला (२५) नील वॅगनरने क्लीन बोल्ड केले. तर, १७ चेंडूंनंतर मायकल सँटनरने श्रीलंकेतर्फे सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या चांदीमलला (५८) तंबूचा मार्ग दाखवला.
न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध गेल्या तीन वर्षांत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला. न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅन्डन मॅक्युलमने दुसरा डाव ३ बाद २६७ धावसंख्येवर घोषित करण्याचा धाडसी निर्णय घेतल्यानंतर, श्रीलंकेकडे ४०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पाच सत्रांपेक्षा अधिक कालावधी होता.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने चौथ्या दिवसअखेर ३ बाद १०९ धावांची मजल मारली होती. पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेलेल्या वेळेची भरपाई करण्यासाठी सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी खेळ निर्धारित वेळेच्या अर्ध्या तासापूर्वी सुरू झाला. श्रीलंका संघाला त्या वेळी लक्ष्य गाठण्यासाठी २९६ धावांची गरज होती. श्रीलंका संघाची आशा अनुभवी फलंदाज चांदीमल व मॅथ्यूज यांच्यावर केंद्रित होती. न्यूझीलंडने ही भागीदारी संपुष्टात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. ट्रेन्ट बोल्टने ग्रीपमध्येही बदल केला. वर्षभराच्या कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या वॅगनरने मॅथ्यूजविरुद्ध सलग दोन बाऊन्सरचा मारा करीत भागीदारी संपुष्टात आणण्याचा पाया रचला. श्रीलंकेच्या कर्णधाराला तिसरा चेंडू आखूड टप्प्याचा येईल, अशी आशा होती; पण वॅगनरने फुललेंथ चेंडू टाकताना मॅथ्यूजचा त्रिफळा उडवला. त्यानंतर लगेच सँटनरने चांदीमलला पायचीत करीत दुसरा धक्का दिला. कितुरुवान वितांगेने आक्रमक पवित्रा स्वीकारला. टीम साऊदीच्या गोलंदाजीवर पायचीत होण्यापूर्वी वितांगेने ३८ धावांची खेळी केली. त्यात चार चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. उपाहाराला खेळ थांबला त्या वेळी श्रीलंकेची ६ बाद २२४ अशी अवस्था होती. त्यानंतर उर्वरित चार विकेट ११ षटकांत ५८ धावांच्या मोबदल्यात माघारी परतल्या. न्यूझीलंडतर्फे साऊदीने ५२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले, तर बोल्ट, वॅगनर व सँटनर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड (पहिला डाव) : ४३१. श्रीलंका (पहिला डाव) : २९४. न्यूझीलंड (दुसरा डाव) : ३ बाद २६७ (घोषित). श्रीलंका (दुसरा डाव) : ९५.२ षटकांत सर्वबाद २८२. (दिनेश चंडीमल ५८, मेंडिस ४६,विथांगे ३८, सिरिवर्धना २९, करुणारत्ने २९. टीम साऊथी ३/५२, मिशेल सँटनेर २/५३, नील वॅग्नर २/५६, ट्रेंट बोल्ट २/५८).

Web Title: New Zealand's glee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.