न्यूझीलंडची शानदार सलामी
By admin | Published: January 12, 2015 02:53 AM2015-01-12T02:53:39+5:302015-01-12T02:53:39+5:30
ब्रँडन मॅक्युलम (२२ चेंडूंत ५१ धावा) आणि कोरी अँडरसन (८१) यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात ३ विकेटस्ने विजय मिळविला़
क्राईस्टचर्च : ब्रँडन मॅक्युलम (२२ चेंडूंत ५१ धावा) आणि कोरी अँडरसन (८१) यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात ३ विकेटस्ने विजय मिळविला़
न्यूझीलंडकडून मॅक्युलमने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले़ त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार लगावले, तर अँडरसन याने ९६ चेंडूंत ११ चौकार आणि १ षटकार खेचला़ श्रीलंकेने दिलेले २१९ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने ४३ षटकांत ७ गड्यांच्या बदल्यात पूर्ण केले़
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला डावाच्या तिसऱ्याच चेंडूवर धक्का बसला़ त्यांचा मार्टिन गुप्टिल भोपळा न फोडताच तंबूत परतला़ मात्र यानंतर मॅक्युलमने बहारदार खेळ करताना अर्धशतकी खेळी साकारली़ कोरी अँडरसन याचीही बॅट चांगलीच तळपली. किवी संघाकडून केन विलियम्स आणि टॉम लॅथम यांनी प्रत्येकी १५ धावांची खेळी केली़
संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : ५० षटकांत ९ बाद २१८़ ( जयवर्धने १०४, थिरीमाने २३, मेंडिस २३; मिशेल मॅक्लेघन ४/२६ ) वि. वि. न्यूझीलंड : ४३ षटकांत ७ बाद २१९़ (ब्रँडन मॅक्युलम ५१, कोरी अँडरसन ८१. नुआन कुलशेखरा २/४३, सचित्रा सेनानायके २/२८)़ (वृत्तसंस्था)