न्यूझीलंडची कामगिरी भारतीय पाठीराख्यांसाठी आश्चर्यकारक

By admin | Published: September 24, 2016 05:33 AM2016-09-24T05:33:50+5:302016-09-24T05:33:50+5:30

नव्या आणि दीर्घ मोसमाची सुरुवात म्हणून भारतासाठी न्यूझीलंड एक सोपे आव्हान असेल

New Zealand's performance is amazing for Indian players | न्यूझीलंडची कामगिरी भारतीय पाठीराख्यांसाठी आश्चर्यकारक

न्यूझीलंडची कामगिरी भारतीय पाठीराख्यांसाठी आश्चर्यकारक

Next

नव्या आणि दीर्घ मोसमाची सुरुवात म्हणून भारतासाठी न्यूझीलंड एक सोपे आव्हान असेल, अशी अपेक्षा केलेल्या भारतीय पाठीराख्यांसाठी किवी संघाची कामगिरी आश्चर्यकारक असेल. आधी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी त्यांचे जबाबदारी चोख बजावताना भारतीय फलंदाजांना ३१८ धावांवर रोखले आणि त्यानंतर किवी फलंदाज टॉम लॅथम आणि केन विलियम्सन यांनी भारतीय गोलंदाजी केवळ खेळून न काढता काही चमकदार फटकेही मारले. नक्कीच सामन्यातील केवळ दोन दिवस झाले असून खेळपट्टीने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केल्याने येथे फलंदाजी करणे सोपे नसेल. त्यामुळे सामना चौथ्या आणि पाचव्या दिवसापर्यंत खेळला जाईल.
न्यूझीलंड कर्णधाराने नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या टीम इंडियाला ५००व्या कसोटीत ५०० धावांचा टप्पा गाठण्याची अपेक्षा होती. त्यातच, मुरली विजय आणी चेतेश्वर पुजारा यांची दमदार खेळी पाहता हे लक्ष्य अवाक्यात वाटत होते. नुकताच झालेल्या वेस्ट इंडिज मालिकेच्या तुलनेत यावेळी पुजारा खूप सकारात्मक दिसला. विंडिज दौऱ्यात तो चाचपडताना आणि स्क्वेर फटका मारताना अडखळताना दिसला. तो लवकर शिकतो आणि त्यामुळेच न्यूझीलंडविरुध्द केवळ खेळपट्टीवर उभे न राहता सातत्याने त्याला धावा काढताना पाहून विशेष वाटले नाही. त्याचप्रमाणे, विंडिज दौऱ्यातील पहिल्या सामन्यानंतर दुखापतग्रस्त झाल्यानंतर विजय पहिलाच सामना खेळत होता. त्यामुळे खेळपट्टीवर जम बसवताना त्याला काही वेळ लागला. विराट कोहलीला आखूड टप्प्यांच्या चेंडूचे आव्हान स्वीकारणे आवडत असल्याची कल्पना किवी गोलंदाजांना होती. त्यामुळेच काही चौकार स्वीकारण्याची तयारी ठेवताना त्यांनी कोहलीविरुध्द आपली रणनिती आखली. तर, रोहित शर्माने आपल्यापरिने खूप मेहनत घेतली. त्याने उत्तम संयम दाखवला. मात्र फटकेबाजीच्या नादामध्ये त्याने आपली विकेट गमावली. परंतु, अश्विनची चिवट फलंदाजी आणि त्यानंतर रविंद्र जडेजा खेळलेले काही अप्रतिम फटके यामुळे भारताला समाधानकार मजल मारण्यात यश आले.
यानंतर गुप्टीलच्या जोरावर न्यूझीलंडने वेगवान सुरुवात केली. गुप्टीलची स्थिती रोहित शर्मासारखीच आहे. रंगीत आणि पारंपारिक जर्सीमध्ये दोघेही वेगळे खेळाडू असतात. भारताने जे रोहितसह केले आहे, तेच किवीने गुप्टीलसह करताना त्याला कसोटीत अनेक संधी दिल्या. कारण दोघांमध्येही प्रतिस्पर्धींच्या अवाक्यातून सामना काढून घेण्याची क्षमता आहे. शिवाय कर्णधाराला, प्रतिस्पर्धी संघाचा डाव संपुष्टात आणण्यास पुरेसा वेळ मिळेल अशी कामगिरी करण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांची आहे.
टॉम लॅथमचा फिरकी गोलंदाजांविरुद्धची कामगिरी शानदार आहे. तसेच लॅथम आणि विलियम्सन यांच्या डाव्या-उजव्या फलंदाजीमुळे भारतीय फिरकीपटूंना जम बसवण्यात अपयश आल्याने अपेक्षेनुसार लाइन आणि लेंथवर मारा करता आला नाही. चहापानाच्यावेळी आणि पावसाला सुरुवात होण्याआधी खेळपट्टीने फिरकीला साथ देण्याचे संकेत दिले. फलंदाजानांही खेळताना अडचणी आल्याने भारतीयांना बळी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, पावसामुळे उरलेला दिवसभरचा खेळ थांबविण्यात आल्याने भारतीयांच्या पदरी निराशा आली. (टीएमजी)

Web Title: New Zealand's performance is amazing for Indian players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.