न्यूझीलंडचा संघर्षपूर्ण विजय

By admin | Published: February 18, 2015 01:51 AM2015-02-18T01:51:50+5:302015-02-18T01:54:16+5:30

न्यूझीलंडला विश्वकप स्पर्धेत मंगळवारी स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीत तीन विकेटस्ने विजय मिळविताना संघर्ष करावा लागला.

New Zealand's struggling victory | न्यूझीलंडचा संघर्षपूर्ण विजय

न्यूझीलंडचा संघर्षपूर्ण विजय

Next

गटात ४ गुणांसह आघाडीवर : स्कॉटलंडवर ३ विकेट व १५१ चेंडू राखून मात
ड्युनेडिन : न्यूझीलंडला विश्वकप स्पर्धेत मंगळवारी स्कॉटलंडविरुद्धच्या लढतीत तीन विकेटस्ने विजय मिळविताना संघर्ष करावा लागला. या स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवत न्यूझीलंडने ‘अ’ गटात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.
ट्रेन्ट बोल्टच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी अचूक मारा करीत न्यूझीलंडच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली होती. न्यूझीलंड संघाने युनिव्हर्सिटी ओव्हल मैदानावर नाणेफेक जिंंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारताना स्कॉटलंडचा डाव ३६.२ षटकांत केवळ १४२ धावांत गुंडाळला. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने २४.५ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. न्यूझीलंडतर्फे बोल्ट व टीम साऊदी यांनी प्रत्येकी २, कोरी अ‍ॅन्डरसनने १८ धावांत ३, अनुभवी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरीने २४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. स्कॉटलंडकडून मॅच मचान (५६) व रिची बॅरिंग्टन (५०) यांनी संघर्षपूर्ण खेळी केल्यामुळे त्यांच्या संघाला शतकाची वेस ओलांडता आली.
छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा निम्मा संघ २१ व्या षटकापर्यंत तंबूत परतला होता. स्कॉटलंडच्या वेगवान गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. न्यूझीलंडतर्फे केन विल्यम्सनने सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली; तर ग्रॅन्ट इलियटने २९ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंड संघाने २५.१ षटके शिल्लक राखून विजय मिळविला असला तरी त्यासाठी त्यांना ७ गड्यांचे मोल द्यावे लागले. न्यूझीलंडचा हा सलग दुसरा विजय असून ‘अ’ गटात हा संघ अव्वल स्थानवर पोहोचला आहे.
स्कॉटलंडचे वेगवान गोलंदाज इयान वार्डला व जोश डेव्ही यांनी अनुक्रमे ५७ व ४० धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३ बळी घेतले.
त्याआधी, बोल्टने दोन चेंडूंच्या अंतरात स्कॉटलंडच्या आघाडीच्या फळीतील कॅमल व हामिश यांना बाद केले. टीम साऊदीने केली कोएत्झर (१) व कर्णधार पे्रस्टन मोमेसन (०) यांना बाद करीत स्कॉटलंडची ४ बाद १२ अशी अवस्था केली होती. मचान व बॅरिंग्टन यांनी पाचव्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. मचानने ७९ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार व १ षटकार लगाविला, तर बॅरिंग्टनने ८० चेंडू खेळताना ४ चौकार व १ षटकार लगाविला. (वृत्तसंस्था)

स्कॉटलंडविरुद्धच्या विजयात गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून, फलंदाजीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, टीम साऊदी व ट्रेन्ट
बोल्ट यांनी अचूक मारा करीत न्यूझीलंडच्या विजयाचा
पाया रचला.
- ब्रेन्डन मॅक्युलम, न्यूझीलंडचा कर्णधार

चेंडूची दिशा व टप्पा अचूक राखला तर खेळपट्टीकडून लाभ मिळतो. आम्ही न्यूझीलंडला संघर्ष करण्यास भाग पाडल्यामुळे निश्चितच आनंद झाला. आमचा संघ अनुभवी नाही, पण आम्ही इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहोत. मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत आम्ही सुरुवातीलाच विकेट गमाविल्यानंतर मचान व रिची यांनी डाव सावरला. त्यामुळे आम्हाला १०० धावांची वेस ओलांडता आली.
- प्रेस्टन मोमेसन, स्कॉटलंडचा कर्णधार

५एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाने युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन मैदानावर सलग ५ वेळा विजय नोंदविले आहेत.

० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत स्कॉटलंडने अजून एकही विजय मिळविलेला नाही. स्कॉटलंडची ही तिसरी विश्वचषक स्पर्धा आहे.

३ न्यूझीलंडने स्कॉटलंडला तीन विकेटने पराभूत केले. १५० धावांचा पाठलाग करताना हा त्यांचा एकदिवसीयमधील सर्वांत कमी फरकाचा विजय आहे. २०१३ मध्ये न्यूझीलंडने श्रीलंकेला एक विकेटने नमविले होते.

४ विश्वचषक स्पर्धेत एखाद्या संघाचे चार फलंदाज शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्कॉटलंडवर आज ही नामुष्की ओढविली, एकदिवसीय क्रिकेटमध्ये यापूर्वी दोन वेळा एका डावात चार फलंदाज शून्यावर बाद झाले होते. (१९९९ मध्ये श्रीलंका व २००३ मध्ये पाकिस्तानात)

५६ स्कॉटलंडकडून ५६ धावांची खेळी करणारा मॅट मॉचन हा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी १९९९ च्या विश्वचषकात गॅव्हिन हेमिल्टनने ७६ व ६३ धावा केल्या होत्या.

२ स्कॉटलंडच्या दोन फलंदाजांनी ५० पेक्षा अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

१४२ स्कॉटलंडचा संघ विश्वचषकामध्ये पाचव्यांदा सर्वांत कमी धावसंख्येवर (१४२) बाद झाला.

५ १५० व त्यापेक्षा कमी धावसंख्येत न्यूझीलंड संघाने एखाद्या संघाला ५ वेळा बाद केले आहे. १९९९ मध्ये स्कॉटलंडलाच कमी धावांत बाद केले होते.

 

स्कॉटलंड : के. कोएत्जर झे. इलियट गो. साऊदी ०१, सी. मॅक्लॉयड पायचित गो. बोल्ट ००, एच. गार्डिनर पायचित गो. बोल्ट ००, एम. मचान झे. मॅक्युलम गो. अ‍ॅन्डरसन ५६, पी. मोमेसन पायचित गो. साऊदी ००, आर. बॅरिंग्टन झे. मिल्स गो. अ‍ॅन्डरसन ५०, एम. क्रॉस झे. रोंची गो. अ‍ॅन्डरसन १४, जे. डेव्ही नाबाद ११, आर. टेलर यष्टिचित रोंची गो. व्हिटोरी ०४, एम. हक झे. टेलर गो. व्हिटोरी ००, आय. वार्डला पायचित गो. व्हिटोरी ००. अवांतर (६). एकूण ३६.२ षटकांत सर्व बाद १४२. गोलंदाजी : साऊदी ८-३-३५-३, बोल्ट ६-१-२१-२, मिल्ने ७-०-३२-०, व्हिटोरी ८.२-१-२४-३, इलियट २-०-११-०, अ‍ॅन्डरसन ५-१-१८-२.

न्यूझीलंड : एम. गुप्तील झे. क्रॉस गो. वार्डला १७, बी. मॅक्युलम झे. क्रॉस गो. वार्डला १५, के. विल्यम्सन झे. क्रॉस गो. डेव्ही ३८, आर. टेलर झे. टेलर गो. हक ०९, जी. इलियट झे. क्रॉस गो. वार्डला २९, सी. अ‍ॅन्डरसन झे. वार्डला गो. डेव्ही ११, एल. रोंची झे. गार्डिनर गो. डेव्ही १२, डी. व्हिटोरी नाबाद ०८, अ‍ॅडम मिल्ने नाबाद ०१. अवांतर (६). एकूण २५.५ षटकांत ७ बाद १४६. गोलंदाजी : आय. वार्डला ९.५-०-५७-३, आर. टेलर ४-०-२७-०, जे. डेव्ही ७-०-४०-३, एम. हक ४-०-२१-१.

Web Title: New Zealand's struggling victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.