पुढील विश्वचषक सहज खेळू शकतो
By admin | Published: March 23, 2017 11:27 PM2017-03-23T23:27:32+5:302017-03-23T23:27:32+5:30
माझ्यातील क्रिकेट अजून संपलेले नाही, याची जाणीव करून देत आपण कसोटीतून निवृत्ती किंवा कर्णधारपदावरून पायउतार झालो
रांची : माझ्यातील क्रिकेट अजून संपलेले नाही, याची जाणीव करून देत आपण कसोटीतून निवृत्ती किंवा कर्णधारपदावरून पायउतार झालो असलो तरी पुढील विश्वचषक सहज खेळू शकतो, असा विश्वास महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केला.
निवृत्तीबाबत विविध कयास लावणाऱ्या टीकाकारांची तोंडे धोनीने स्वत:च्या वक्तव्यातून बंद केली. माहीने नुकतेच झारखंड संघाचे नेतृत्व करून विजय हजारे करंडकाची उपांत्य फेरी गाठली होती. कसोटीतून निवृत्त झाल्यानंतरही धोनीने स्थानिक क्रि केट सामन्यांत सहभागी होऊन स्वत:चा फिटनेस जपला. नुकताच त्याने एका व्यावसायिक कार्यक्रमात चाहत्यांशी संवाद साधला. या वेळी त्याला फिटनेस व भविष्यात देशाकडून किती काळ खेळण्याचा मानस आहे, याबाबत विचारण्यात आले.
क्रि केटमधून केव्हा निवृत्त व्हावे लागेल, याचा अंदाज आपण कधीही घेऊ शकत नाही. एखादी मोठी दुखापतदेखील खेळाडूला निवृत्त होण्यास भाग पाडू शकते; पण सद्य:स्थितीत मी पुढील विश्वचषक सहज खेळू शकेन, असे धोनी म्हणाला.
विश्वचषकाला आजपासून आणखी दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. या दोन वर्षांत काय होईल, हे सांगता येत नाही. याशिवाय, संघाच्या वेळापत्रकावरही पुढचे डावपेच ठरतील. सतत १० वर्षे क्रि केट खेळल्यानंतर आपण एखाद्या ‘व्हिंटेज कार’सारखे होतो. शरीराकडे अधिक लक्ष द्यावे लागते, असेही माहीने सांगितले.
काही महिन्यांपासून भारतीय संघाचे कसोटी दौरे सुरू असल्याने धोनी राष्ट्रीय संघापासून दूर आहे. याच वेळी त्याने झारखंडकडून स्थानिक सामन्यांमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. झारखंड संघाचे नेतृत्व करून युवा सहकाऱ्यांना प्रोत्साहन दिले. धोनी आता भारतीय संघात थेट चॅम्पियन्स चषकात खेळताना दिसेल. आयसीसी चॅम्पियन्स चषकानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करू शकतो, अशी शक्यता वारंवार वर्तविण्यात आली होती. (वृत्तसंस्था)