'त्या' रात्री बांगलादेशचा संघ जेवला नाही
By Admin | Published: April 12, 2016 09:24 AM2016-04-12T09:24:31+5:302016-04-12T09:25:28+5:30
टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताकडून एक रन्सने झालेला पराभव बांगलादेशच्या इतका जिव्हारी लागला होता की, त्या रात्री बांगलादेशच्या संघातील एकही खेळाडू जेवला नव्हता.
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. १२ - टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताकडून एक रन्सने झालेला पराभव बांगलादेशच्या इतका जिव्हारी लागला होता की, त्या रात्री बांगलादेशच्या संघातील एकही खेळाडू जेवला नव्हता. बांगलादेशचा कर्णधार मश्रफे मोर्तझाने स्वत: ही माहिती सांगितली. मोर्तझा सध्या काश्मिरमध्ये सुट्टया घालवण्यासाठी आला आहे.
भारताकडून झालेल्या पराभवाने आम्ही अत्यंत निराश झालो होतो. त्या रात्री आम्ही कोणी जेवलो नाही. पराभव हा खेळाचा एक भाग असला तरी, आम्हाला तो सामना गमावायचा नव्हता असे स्थानिक संकेतस्थळाने मोर्तझाच्या हवाल्याने म्हटले आहे.
मोर्तझाने काश्मिरमधल्या स्थानिक क्रिकेटपटूंशी संवाद साधला. तेव्हा एका स्थानिक मुलाने बांगलादेश शेवटच्या तीन चेंडूत दोन धावा करु शकला नाही असा प्रश्न त्याला विचारला. त्याला उत्तर देताना मोर्तझाने ही कबुली दिली.
सोनमर्गहून श्रीनगरच्या दिशेने जात असताना कुलान येथे त्याला काही स्थानिक मुले क्रिकेट खेळताना दिसली. मोर्तझा गाडी थांबवून तिथे गेला. त्याने मुलांशी संवाद साधला, त्यांच्यासोबत क्रिकेट खेळला.