निखत जरीनने वाढवली देशाची शान; महिंद्राकडून 'थार' गिफ्ट देऊन सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 03:27 PM2023-08-10T15:27:20+5:302023-08-10T15:30:55+5:30
महिंद्राकडून आता निखत जरीनला कंपनीने ऑफरोड एसयुव्ही थार एसयुव्ही गिफ्ट केली आहे.
भारताची स्टार महिला बॉक्सर निखत जरीनने २६ मार्च २०२३ रोजी दुसऱ्यांदा विश्व चॅम्पियनचा खिताब पटकावला आहे. निखतने भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला होता. तिने महिलांच्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ५० किलो वजनी गटात ही किमया साधून तिरंग्याची शान वाढवली. महिंद्रा कंपनीकडून नेहमीच भारताची शान आणि मान वाढवणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला जातो. महिंद्रा अँड महिंद्रा ग्लोबलकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते.
महिंद्राकडून आता निखत जरीनला कंपनीने ऑफरोड एसयुव्ही थार एसयुव्ही गिफ्ट केली आहे. दक्षिण आफ्रिकेत नुकतेच पार पडलेल्या सोहळ्यात तिला ही कार भेट देण्यात आली. राजधानी दिल्लीत पार पडलेल्या चॅम्पियनशीप स्पर्धेत निखतने विश्व महिला बॉक्सिंगचा खिताब जिंकत गोल्ड मेडल मिळवले होते. त्यावेळी, महिंद्रा कंपनीकडून निखतला एसयुव्ही थार कार गिफ्ट करणार असल्याची घोषणा केली होती. भारताच्या निखतने ५० किलो वजनी गटात व्हिएतनामच्या एनगुएन थि ताम हिला ५-० असे नमवत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्यावेळी, पुरस्कार म्हणून तिला १ लाख डॉलर बक्षीस मिळाले होते.
निखतला बक्षीस म्हणून मिळालेल्या रकमेतून मर्सिडीज कार घेण्याचं तिचं स्वप्न होतं. मात्र, महिंद्रा कंपनीकडून तिला थार कार गिफ्ट करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वीही कंपनीकडून अनेक दिग्गज खेळाडूंना त्यांच्या उत्कृष्ट प्रदर्शनानंतर महिंद्रा थार गिफ्ट देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, ऑलिंपिकविजेत्या खेळाडूंचा आणि काही क्रिकेटर्सचा समावेश आहे.
भारतीय एथलेट नीरज चोप्रानेही गोल्ड मेडल पटकावल्यानंतर कंपनीकडून त्याला थार कार गिफ्ट करण्यात आली. त्यासाठी कंपनीने XUV700 चे स्पेशल मॉडेल विकसित केलं होतं.
निखत झरीनचे सोनेरी यश
खरं तर या स्पर्धेतील निखतचे हे दुसरे विजेतेपद आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन विजेतेपदे पटकावणारी निखत ही दुसरी भारतीय महिला बॅक्सर ठरली आहे. यंदा या स्पर्धेत आतापर्यंत भारताच्या तीन महिला बॉक्सरनी सुवर्णपदावर नाव कोरले आहे. निखतच्या या सोनेरी यशानंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खानने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.
सलमान खानकडूनही कौतुक
सलमान खानने ट्विटच्या माध्यमातून म्हटले होते, "जेव्हा तू मला शेवटची भेटली होतीस तेव्हा तू मला प्रॉमिस केले होते की तू पुन्हा जिंकशील आणि तू ते केलेसच. निखतचा खूप अभिमान वाटतो. महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन."