निशिकोरी, हालेप, मुगुररुजा तिसऱ्या फेरीत
By admin | Published: May 26, 2016 03:50 AM2016-05-26T03:50:16+5:302016-05-26T03:50:16+5:30
जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने आपल्या कारकिर्दीतील २२व्या विजेतेपदासाठी दमदार सुरुवात केली. त्याचबरोबर पाचवी मानांकित
पॅरिस : जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने आपल्या कारकिर्दीतील २२व्या विजेतेपदासाठी दमदार सुरुवात केली. त्याचबरोबर पाचवी मानांकित जपानची केई निशिकोरी, स्पेनची गरबाईन मुुगुररुजा व रोमानियाची सिमोना हालेप यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला गटात पाचव्या मानांकित व्हिक्टोरिया अझारेंकाला पहिल्या फेरीतच पराभवाचा धक्का बसला. भारताचे रोहन बोपन्ना आणि लिएंडर पेस यांनी आपापल्या जोडीदारांसह दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला.
अग्रमानांकित सेरेना विल्यम्सने पहिल्या फेरीत स्लोव्हाकियाच्या मगाडेलेना रिबारिकोव्हाला ६-२, ६-२, अशा सलग सेटमध्ये पराभूत करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सेरेनाच्या झंझावातासमोर रिबारिकोव्हाला काहीच करता आले नाही. सेरेनाला दुसऱ्या फेरीत ब्राझीलच्या तेलियाना पेरियराशी दोन हात करावे लागणार आहेत. पेरियराने झेक गणराज्याच्या क्रिस्टिना प्लिस्कोव्हाचा तीन तास चाललेल्या सामन्यात ७-५, ३-६, ९-७ असा पराभव केला. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात पाचवी मानांकित निशिकोरीने रशियाच्या आंद्रेई कुझ्नेत्सोव्हाला ६-३, ६-३, ६-३ अशा सलग सेटमध्ये पराभूत केले. (वृत्तसंस्था)
चौथी मानांकित मुगुरुरजाने फ्रान्सची मिरटाईल जॉर्जिसला ६-२, ६-० असे, तर हालेपने कझाकिस्तानच्या जलिना डियासला ७-६, ६-२ असे पराभूत केले. चेक गणराज्याच्या पेत्रा क्वितोव्हाने तैवानच्या सी सू वेईला ६-४, ६-१ असे, तर रशियाच्या स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हाने ब्रिटनच्या हिथर वॉटसनला ६-१, ६-३ असे पराभूत करून तिसऱ्या फेरीतील स्थान पक्के केले.
महिला गटात बुधवारी एक मोठा उलटफेर झाला. पाचवी मानांकिंत व्हिक्टोरिया अजारेंकाला पहिल्या फेरीतच बाहेर पडावे लागले. इटलीच्या करीन नैप हिने तिला ६-३, ६-७, ४-० असे पराभूत केले. पहिला सेट गमावल्यानंतर दुसरा सेट जिंकून अजारेंकाने सामन्यात रंग भरला. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये ४-० अशा पिछाडीनंतर ती जखमी होऊन बाहेर पडली.
बोपन्ना व त्याचा रोमानियाचा साथीदार फ्लोरिन मर्गिया यांनी पहिल्या फेरीत स्टेफनी रॉबर्ट आणि अलेक्सांद्रे सिडोरेंका या फ्रान्सच्या जोडीचा ६-२, ६-२ असा पराभव केला, तर पेस आणि त्याचा पोलंडचा साथीदार मार्सिन मातकोवस्की या १६व्या मानांकित जोडीने बेलारुसचा एलियाकसांद्र बुरी आणि उझबेकिस्तानचा डेनिस इस्तोमिन जोडीचा
७-६, ७-६ असा पराभव केला.
पुरुषांच्या गटात स्पेनच्या डेव्हिड फेरर व स्पेनच्या फेलिसियानो लोपेजने पुढील फेरीत प्रवेश केला. लोपेजने इटलीच्या थॉबस फाबियानोला ६-४, ६-४, ३-६, ६-२ असे पराभूत केले. द्वितीय मानांकित ब्रिटनच्या अँडी मरेने ५ सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत फ्रान्सच्या माथियास बोरगेचा ६-२, २-६, ४-६, ६-२, ६-३ असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला.