निशिकोरी, रदवांस्का दुसऱ्या फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2016 03:08 AM2016-05-25T03:08:04+5:302016-05-25T03:08:04+5:30
पाचव्या मानांकित जपानच्या केई निशिकोरीने पुरुष विभागात, तर महिलांमध्ये दुसऱ्या मानांकित पोलंडच्या अॅग्निस्का रदवांस्काने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून वर्षातील
पॅरिस : पाचव्या मानांकित जपानच्या केई निशिकोरीने पुरुष विभागात, तर महिलांमध्ये दुसऱ्या मानांकित पोलंडच्या अॅग्निस्का रदवांस्काने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून वर्षातील दुसऱ्या ग्रॅण्डस्लॅम फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत निशिकोरीने इटलीच्या सिमोन बोलेलीचा सलग दोन सेटमध्ये ६-१, ७-५, ६-३ ने पराभव केला. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत दुसऱ्या मानांकित रदवांस्काने सर्बियाच्या बोजाना जोवानोवस्कीचा ६-०, ६-२ ने धुव्वा उडवला. पुरुष विभागात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला अँडी मरे आणि चेक प्रजासत्ताकाचा ३७ वर्षीय रादेक स्टेपानेक यांच्यादरम्यानच्या लढतीत पावसाचा व्यत्यय निर्माण झाला. या लढतीत मरे सुरुवातीचे दोन्ही सेट गमावून पिछाडीवर होता. पावसाचा व्यत्यय आला त्या वेळी स्कोअर ३-६, ३-६, ६-०, ४-२ असा होता.
अन्य लढतींमध्ये अनेक दिग्गजांना धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले. माजी यूएस ओपन चॅम्पियन व १०वे मानांकन प्राप्त मारिन सिलीचला अर्जेंटिनाचा खेळाडू मार्को ट्रुनगॅरेटीविरुद्ध ७-६, ३-६, ६-२, ६-२ ने पराभव स्वीकारावा लागला. महिला विभागात सातवे मानांकन प्राप्त इटलीची रॉबर्टा विन्सी व १६वे मानांकन प्राप्त सारा इराणी यांच्यासाठी वाईट दिवस ठरला. विन्सीला युक्रेनच्या कॅटरिना बोडारेन्कोने ६-१, ६-३ ने, तर २००२ची उपविजेती साराला बुल्गारियाच्या स्वेताना पिरोनकोव्हाने ६-३, ६-२ ने पराभूत केले.
पुरुष विभागात अन्य लढतींमध्ये १६वे मानांकन प्राप्त फ्रान्सचा जाइल्स सिमोन, २२वे मानांकन प्राप्त व्हिक्टर ट्रोएकी यांनी पहिल्या विजयाची नोंद केली. सिमोनने ब्राझीलच्या रोगोरियो डुट्रा सिल्वाचा ७-६, ६-४, ६-२ ने, तर सर्बियाच्या ट्रोएकीने बुल्गारियाच्या गिग्रोर दिमित्रोव्हचा २-६, ६-३, ५-७, ७-५, ६-३ ने पराभव केला.
बिगरमानांकित स्पेनच्या फर्नांडो बरदास्कोने ३३व्या मानांकित अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनचा ७-५, ६-४, ७-५ने, तर ३०वे मानांकन प्राप्त फ्रान्सच्या जर्मी चार्डीने अर्जेंटिनाच्या लियोनार्डो मेयरचा ६-४, ३-६, ६-४, ६-२ ने पराभव करून दुसरी फेरी गाठली.
महिला एकेरीत पहिल्या फेरीत २५व्या मानांकित रोमानियाच्या इरिना बेगूने अमेरिकेच्या बेथानी मॅटेक सँड््सचे आव्हान ५-७, ६-१, ६-३ ने मोडून काढले. १७व्या मानांकित चेक प्रजासत्ताकाच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाला बिगरमानांकित अमेरिकन खेळाडू शैल्बी रॉजर्सविरुद्ध ३-६, ६-४, ६-३ ने पराभवाला सामोरे जावे लागले. सहाव्या मानांकित रोमानियाच्या सिमोना हालेपने जपानाच्या नाओ हिबिनोविरुद्ध ६-२, ६-० ने सहज विजय नोंदविला. (वृत्तसंस्था)