आॅस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात ‘नो चेंज’
By admin | Published: February 15, 2017 12:41 AM2017-02-15T00:41:18+5:302017-02-15T00:41:18+5:30
आगामी २३ फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या आॅस्टे्रलियाविरुध्दच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज असून
मुंबई : आगामी २३ फेब्रुवारीपासून सुरु होत असलेल्या आॅस्टे्रलियाविरुध्दच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज असून राष्ट्रीय निवडकर्त्यांनी संघात कोणताही बदल केलेला नाही. नुकताच झालेल्या एकमेव कसोटीत बांगलादेशला नमवणारा भारतीय संघ आॅस्टे्रलियाविरुध्दच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी कायम ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी, अनुभवी लेग स्पिनर अमित मिश्र दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. बांगलादेशविरुध्दही तो खेळला नव्हता, तर त्याच्या जागी पर्याय म्हणून कुलदीप यादवची संघात वर्णी लागली होती. मिश्रा अजूनही दुखापतीतून सावरलेला नसून एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्त्वाखालील निवड समितीने यादवचा समावेश असलेला १६ सदस्यांचा भारतीय संघ कायम ठेवला आहे.
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला देखील संघात स्थान मिळालेले नाही. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर तो जवळजवळ तंदुरुस्त झालेला होता. परंतु, यानंतर त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तसेच, अजिंक्य रहाणे, जयंद यादव आणि हार्दिक पांड्या यांनी आपले स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे.
मुरली विजय आणि केएल राहुल या सलामीवीरांकडून भारताला भक्कम सुरुवातीची अपेक्षा असेल. विजयने आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यात यश मिळवले असले, तरी राहुलला मात्र बांगलादेशविरुद्ध आपल्या लौकिकानुसार खेळ करण्यात अपयश आले होते. त्यामुळे त्याच्यावर विशेष जबाबदारी असेल. त्याचप्रमाणे, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांच्यासह मुंबईकर रहाणे व यष्टीरक्षक रिध्दिमान साहा यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल.
रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जडेजा या स्टार अष्टपैलू खेळाडूंवरही भारताची मुख्य मदार असेल. दोघांचाही फिरकी मारा कागारुंना लोळवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. तसेच, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव या त्रयीकडे वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल. (क्रीडा प्रतिनिधी)
या मालिकेतील पहिला कसोटी सामना पुण्यामध्ये २३ ते २७ फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाणार आहे.
बंगळुरु येथे ४ ते ८ मार्च दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळविण्यात येईल. यानंतर मालिकेतील अखेरचे दोन कसोटी सामने रांची (१६ - २० मार्च) आणि धर्मशाळा (२५-२९ मार्च) येथे खेळविण्यात येतील.
पहिल्या दोन कसोटीसाठी संघ
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिध्दिमान साहा, रविचंद्रम आश्विन, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, करुण नायर, जयंद यादव, कुलदीप यादव, अभिनव मुकुंद आणि हार्दिक पांड्या.