पाकिस्तान बरोबर फायनलसाठी कुठल्याही बदलाची गरज नाही - विराट कोहली
By admin | Published: June 16, 2017 11:56 AM2017-06-16T11:56:50+5:302017-06-16T12:21:49+5:30
पाकिस्तान विरुद्ध रविवारी होणा-या अंतिम फेरीच्या सामन्यात संघात फारसे बदल करणार नसल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 16 - पाकिस्तान विरुद्ध रविवारी होणा-या अंतिम फेरीच्या सामन्यात संघात फारसे बदल करणार नसल्याचे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत. संपूर्ण स्पर्धेत आम्ही ज्या प्रकारचे क्रिकेट खेळतोय अंतिम फेरीतही तसाच क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न असेल. पाकिस्तानची बलस्थाने आणि कमकुवतपणा ठाऊक आहे. त्यामुळे त्यानुसार रणनीती आखून खेळण्याचा प्रयत्न असेल.
सध्या आम्ही ज्या प्रकारचे क्रिकेट खेळतोय त्यापेक्षा वेगळे काही करण्याची गरज आहे असे मला वाटत नाही असे विराट म्हणाला. स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेऊन त्यादिवशी चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न असेल असे विराटने सांगितले. पाकिस्तानला काय संदेश देणार या प्रश्नावर कोहलीने थेट उत्तर टाळले.
असा कुठलाही संदेश देण्याची गरज नाही. तुम्ही फायनल खेळण्यासाठी मानसिक दृष्टया तयार नसाल तर, तुम्ही 100 टक्के फिट आहात किंवा तुम्ही मोठा विजय मिळवून इथवर पोहोचलात याला अर्थ उरत नाही असे कोहली म्हणाला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी तुम्ही कुठला अंदाज बांधू नका. या स्पर्धेत अनेक आश्चचर्यकारक निकाल पाहायला मिळालेत. आम्ही फायनलमध्ये खेळण्याचा आनंद घेणार आहोत असे कोहली म्हणाला.
आम्ही चांगले क्रिकेट खेळत आहोत. आम्ही कुठलीही गोष्ट गृहित धरणार नाही. आम्ही नऊ विकेटने जिंकलो किंवा एक विकेटने फरक पडत नाही. आम्ही मैदानावर उतरल्यानंतर पुन्हा तसेच क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करु असे कोहली म्हणाला. अंतिम फेरीत पोहोचलेल्या पाकिस्तानी संघाचेही कोहलीने कौतुक केले. पाकिस्तानी संघाने मला प्रभावित केलेय. ते उत्तम क्रिकेट खेळले आहेत असे कोहली म्हणाला.
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरी गाठली. बांगलादेशने दिलेले २६५ धावांचे आव्हान टीम इंडियाने ४०.१ षटकांत ९ गडी राखून पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो शतकवीर रोहित शर्मा. त्याने १२९ चेंडूत १२३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला कर्णधार विराट कोहली (९६) आणि सलामीवीर शिखर धवन (४६) यांनी दमदार साथ दिली.
तत्पूर्वी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने घेतलेल्या दोन बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला २६४ धावात गुंडाळले. बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बाल आणि मुशीफिकूर रहीम यांनी शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. त्या वेळी कर्णधाराने चेंडू केदारकडे सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत केदारने तमीम इक्बालला त्रिफळाचीत केले. त्यानंतर प्रमुख गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली.