गावात टीव्ही नाही अन् नेटवर्कही मिळेना... ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या सलिमाचा सामना कुटुंबीयांना पाहता येईना!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 12:04 AM2021-08-04T00:04:30+5:302021-08-04T00:06:04+5:30
Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचल उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताला आणखी एक पदक मिळण्याचे वेध लागले आहेत.
Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचल उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे भारताला आणखी एक पदक मिळण्याचे वेध लागले आहेत. संपूर्ण देशवासीयांचं लक्ष आता उद्याच्या अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्याकडे असणार आहे. पण दुर्दैवाची बाब अशी की भारतीय महिला हॉकी संघात प्रतिनिधीत्व करत असलेल्या सलिमा टेटे हिच्या कुटुंबीयांना मात्र सामना लाइव्ह पाहता येणार नाहीय. यामागचं कारण हे देशाच्या ग्रामीण भागाचं वास्तव दाखवून डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्यासारखंच आहे. सलिमा ज्या गावात राहते त्या गावात टेलिव्हिजन नाही. त्याचबरोबर गावात मोबाइलला नेटवर्क देखील मिळत नाही. त्यामुळे इंटरनेट तरी कुठून येणार?
सलिमा देशाचं प्रतिनिधीत्व करत जागतिक व्यासपीठावर बहुमोलाची कामगिरी करत असताना तिच्या कुटुंबीयांना मात्र तिला खेळताना पाहता येणार नाही यापेक्षा वेगळं दुर्दैवं ते काय असावं? असा प्रश्न उपस्थित राहतो.
सलिमा ही मूळची झारखंडमधील बडकिचपार या लहान गावातून आली आहे. ४५ घरांचं हे एक छोटसं गावं आहे. पण गावाची अवस्था फारच बिकट आहे. "सलिमाचा आम्हाला अभिमान वाटतो. ती उपांत्य फेरीत देशाचं प्रतिनिधीत्व करणार आहे याचा खूपच आनंद आहे. भारतीय संघ उपांत्य फेरी देखील जिंकेल अशी आशा आम्हाला आहे. गावात कुणाकडेच टेलिव्हिजन नाही. मोबाइलला रेंज नाही. काही वेळ रेंज आली तरी स्पष्ट काही ऐकू येत नाही. आम्हा सर्वांना सामना पाहायचा होता. पण ते काही शक्य होईल असं वाटत नाही. असं असलं तरी आमच्या सर्वांच्या भारतीय संघासोबत शुभेच्छा कायम असतील", असं सलिमाची बहिणी महिमा म्हणाली.