पश्चिम विभागाने काढली उत्तरेची हवा
By Admin | Published: February 14, 2017 12:09 AM2017-02-14T00:09:12+5:302017-02-14T00:09:12+5:30
अष्टपैलू इरफान पठाणची अचूक गोलंदाजी आणि कर्णधार पार्थिव पटेलचे तडाखेबंद अर्धशतक या जोरावर पश्चिम विभागाने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत
मुंबई : अष्टपैलू इरफान पठाणची अचूक गोलंदाजी आणि कर्णधार पार्थिव पटेलचे तडाखेबंद अर्धशतक या जोरावर पश्चिम विभागाने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत उत्तर विभागाचा ८ विकेट आणि ४४ चेंडू राखून धुव्वा उडवला. उत्तर विभागाने दिलेले १०८ धावांचे आव्हान पश्चिम विभागाने १२.४ षटकांतच दोन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पश्चिम विभागाने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि उत्तर विभागाचा डाव २० षटकांत ८ बाद १०७ धावांवर रोखला. पश्चिम विभागाच्या माऱ्यापुढे उत्तर विभागाची फलंदाजी स्वस्तात कोसळली.
या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पश्चिम विभागाच्या श्रेयश अय्यर (२६ चेंडूंत ३०) आणि पार्थिव (३५ चेंडूंत ५६) यांनी तुफानी सुरुवात करताना ९ षटकांत ८० अशी धमाकेदार सलामी दिली. फिरकीपटू परवेझ रसूलने अय्यरला बाद करून ही जोडी फोडली खरी, परंतु तोपर्यंत पश्चिम विभागाचा विजय निश्चित झाला होता. तसेच, दुसरीकडे पार्थिव अर्धशतक झळकावून लगेच बाद झाला. यानंतर, आदित्य तरे (नाबाद १४) आणि अंकित बावणे (नाबाद ४) यांनी संघाच्या १२.४ षटकांत विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, इरफान पठाणने ४ षटकांत १० धावांच्या मोबदल्यात ३ हुकमी फलंदाज बाद करून उत्तर प्रदेशच्या फलंदाजीला खिंडार पाडले. तसेच, शार्दुल ठाकूर, ईश्वर चौधरी आणि अभिषेक नायर यांनी प्रत्येकी एक बळी घेत पठाणला चांगली साथ दिली. उत्तर विभागाकडून अनुभवी सलामीवीर गौतम गंभीरने ५८ चेंडंूत ६० धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली.
याव्यतिरीक्त एकाही फलंदाजाला छाप पाडता आली नाही. (क्रीडा प्रतिनिधी)