पुनरागमन नव्हे, ही तर सातत्यपूर्ण कामगिरी - तेजस्विनी सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 02:07 AM2018-04-21T02:07:13+5:302018-04-21T02:07:13+5:30
‘काहींच्या मते मी पुनरागमन केले आहे. पण खरं म्हणजे, तो छोटा ब्रेक होता. हे माझ्या कामगिरीतील सातत्य आहे,’ या शब्दात नेमबाज तेजस्विनी सावंत हिने राष्ट्रकुलमधील कामगिरीचे समर्थन केले आहे.
मुंबई :‘काहींच्या मते मी पुनरागमन केले आहे. पण खरं म्हणजे, तो छोटा ब्रेक होता. हे माझ्या कामगिरीतील सातत्य आहे,’ या शब्दात नेमबाज तेजस्विनी सावंत हिने राष्ट्रकुलमधील कामगिरीचे समर्थन केले आहे.
कोल्हापूरच्या तेजस्विनीने राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मी. रायफल थ्री पोजिशन प्रकारात सुवर्ण पदक तर ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली आहे. ती म्हणाली,‘जे मला ओळखत नाहीत, त्यांच्या मते हे पुनरागमन असू शकते. माझ्यामते माझा खेळातील प्रवास सातत्यपूर्ण असाच आहे. २०१४ च्या राष्टÑकुलनंतर कौटुंबिक कारणास्तव मी दोन महिन्यांचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर कामगिरी निराशाजनक झाल्याने माझी निवड होऊ शकली नव्हती. २०१५ नंतर मी भारतीय संघात अव्वल स्थानी असून कामगिरीही चांगली झाली आहे. मी दीर्घ ब्रेक घेत पुनरागमन केलेले नाही. राष्टÑकुल आणि आशियाड हे २०२० च्या आॅलिम्पिकची तयारी करण्यास मोलाची भूमिका बाजवतील.’
नेमबाजीचा प्रवास कधीपर्यंत सुरू ठेवणार असा प्रश्न विचारताच तेजस्विनी म्हणाली,‘माझी आवड असेपर्यंत नेमबाजी सुरुच राहील. २०२० चे आॅलिम्पिक माझ्यासाठी मोलाचे आहे. आशियाड यातील एक टप्पा आहे. मी आणि प्रशिक्षक कुहीली गांगुली यांनी जो विचार केला तसेच घडले. आता आशियाडचे सुवर्ण मिळविणे लक्ष्य असेल.’ (वृत्तसंस्था)
पदके शहीद जवानाला समर्पित...
राज्य शासनाच्या क्रीडा विभागात सहायक संचालक असलेल्या तेजस्विनी सावंतने आपले पती समीर दरेकर आणि परिवाराला कौतुक सोहळा लांबवू नका, असे स्पष्ट शब्दात बजावले.
यादरम्यान तिला मिळालेली पदके तिने पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेला औरंगाबादचा जवान किरण थोरातला समर्पित करीत वेगळेपण सिद्ध केले आहे.
जवानांशी तेजस्विनीचे अतूट नाते...
तेजस्विनी सावंत आणि भारतीय सैन्य दलाचे एक अतूट नाते आहे. तेजस्विनीचे आजोबा भारतीय सैन्यात होते. तिच्या वडिलांनी काही काळ भारतीय नौदलात काम केले.
आपल्यालाही सैन्यात भरती होण्यासाठी संधी समोर आली होती, मात्र मला कुटुंब सोडून राहणे शक्य नसल्याने मी पुढे सैन्य दलात गेले नाही, असे सांगत तेजस्विनीने आठवणींना उजाळा दिला.