ऑलिम्पिक आयोजनासाठी ठोस तोडगा नाहीच, कोरोना संक्रमण ठरतोय मोठा अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 04:49 AM2020-03-19T04:49:33+5:302020-03-19T04:49:53+5:30
कोरोनाचा जगभर प्रकोप वाढल्यानंतरही २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिकचे आयोजन झाले, तर आम्हाला आरोग्याविषयी मोठी जोखीम पत्करावी लागेल
लुसाने : ‘यंदा टोकिओ ऑलिम्पिकचे आयोजन करण्यासाठी कोरोनाचा प्रकोप मोठा अडथळा ठरत आहे,’ अशी जाहीर कबुली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दिली. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी असाधारण तोडगा काढण्याची गरज असल्याचे आयओसी प्रवक्त्याने म्हटले. ते म्हणाले, ‘कोरोनावर मात करण्यासाठी असाधारण समाधान शोधवे लागेल.’
कोरोनाचा जगभर प्रकोप वाढल्यानंतरही २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिकचे आयोजन झाले, तर आम्हाला आरोग्याविषयी मोठी जोखीम पत्करावी लागेल, अशी बोचरी टीकाही अनेक दिग्गज खेळाडूंनी आयओसीवर केली होती. यानंतर बुधवारी आयओसीने प्रथमच टोकियो ऑलिम्पिक आयोजनासाठी आदर्श तोडगा निघाला नसल्याचे कबूल केले.
प्रवक्ता पुढे म्हणाला, ‘ऑलिम्पिक आयोजनाची अखंडता आणि खेळाडूंचे आरोग्य लक्षात घेता आयोजनासाठी आदर्श तोडगा शोधणे गरजेचे आहे. यामुळे खेळाडूंवर नकारात्मक प्रभाव पडणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी लागेल. खेळाडूंच्या आरोग्यास सर्वोच्च प्राधान्य असेल. आदर्श समाधान निघाल्यानंतरच टोकियो आॅलिम्पिकच्या आयोजनाचा निर्णय घेता येऊ शकेल.’
बांबू उडीतील ऑलिम्पिक चॅम्पियन कॅटरिना स्टेफेनिडी व ब्रिटिश हेप्टथलानपटू कॅटरिना जॉन्सन यांनी २४ जुलैपासून आॅलिम्पिक होत असेल, खेळाडूंच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न उपस्थित केला होता. (वृत्तसंस्था)
टोकियो ऑलिम्पिक जिम्नॅस्टिक टेस्ट रद्द
टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजकांनी बुधवारी सांगितले की, ‘चार आणि पाच एप्रिल रोजी होणारी जिम्नॅस्टिक चाचणी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. जापान जिम्नॅस्टिक संघाने लयबद्ध जिम्नॅस्टिक ऑल अराऊंड विश्वचषक रद्द केला आहे.’
कोरोना व्हायरस महामारीनंतरही आयओसीने स्पष्ट केले आहे की, ‘ऑलिम्पिक निर्धारीत २४ जुलै रोजीच होईल.’ त्याचवेळी, एका स्थानिक सर्व्हेनुसार ७० टक्के जापानी लोकांना वाटते की, ऑलिम्पिक निर्धारीत वेळेनुसार होणार नाही. दरम्यान ऑलिम्पिक मशाल येथे शुक्रवारी ग्रीसहून विमानाने पोहचेल. चार महिने रंगणाऱ्या मशाल रिलेला २६ मार्च पासून सुरूवात होईल.