इच्छामरणाची ही वेळ नव्हे!
By admin | Published: September 13, 2016 03:39 AM2016-09-13T03:39:08+5:302016-09-13T03:39:08+5:30
जगण्यासाठी सारखी लढाई सुरूच आहे.’ रिओत सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये बेल्जियमची मारिका व्हेरमूर्त हिची ही प्रेरणादायी कहाणी
रिओ : ‘ती मांसपेशींच्या विकृतीसारख्या असाध्य आजाराने पीडित आहे. या आजारामुळे तिच्या पायांमध्ये इतके दुखणे उमळते की रात्री झोपदेखील लागत नाही. १४ व्या वर्षी तिला या आजाराची माहिती झाली. तेव्हापासून जगण्यासाठी सारखी लढाई सुरूच आहे.’
रिओत सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये बेल्जियमची मारिका व्हेरमूर्त हिची ही प्रेरणादायी कहाणी! सोमवारी ३७ व्या वर्षी मारिकाने महिलांच्या व्हिलचेअरच्या ४०० मीटर दौडीत रौप्य जिंकले. पदक जिंकताच जगणे किती सुंदर आहे, याची तिला प्रचिती आली असावी. ती म्हणते, इच्छामरणाची ही वेळ नव्हे...!
बेल्जियममध्ये ‘यूथेनिसिया’ अर्थात इच्छामरणाला वैधानिक मान्यता आहे. मारिकाने २००८ साली आयुष्याला कंटाळून इच्छामृत्यूच्या कागदपत्रांवर स्वाक्षरीदेखील केली. आॅलिम्पिक पदक जिंकण्याच्या धेय्याने झपाटलेली ही खेळाडू जगण्यातील संघर्षावर मात करीत सराव करीत राहिली. अखेर तिच्या संघर्षाला यश आले व तिने पदकही जिंकले. पदक हातात येताच ती म्हणाली,‘से नो टू डाय...!’
बेल्जियमच्या मीडियाने रिओ पॅरालिम्पिकनंतर मारिका स्वत:चे आयुष्य संपवू शकते, असे वृत्त प्रकाशित केले होते. आज खुद्द मारिकाने एका पत्रकार परिषदेत इच्छामरणासंदर्भातील सर्व बातम्यांचे खंडण केले. ती म्हणाली, ‘‘आता तर आयुष्यातील सर्व लहानमोठ्या प्रसंगांचा आनंद घेण्यास सज्ज आहे.’’
मारिका पुढे म्हणाली, ‘‘आयुष्य किती सुंदर आहे, हे मला आता कळले. चांगल्या दिवसांच्या तुलनेत वाईट दिवस अधिक असतील, असे कळून चुकेल त्या वेळी मी इच्छेनुसार मरण पत्करेन. पण सध्यातरी ती वेळ आलेली नाही.’’
व्हीलचेअर रेसला करिअर म्हणून निवडणारी मारिका २०१२ च्या लंडन पॅरालिम्पिकमधील १०० मीटर प्रकारात सुवर्ण आणि २०० मीटर प्रकारातील रौप्य विजेती आहे. (वृत्तसंस्था)