बलाढ्य नसलो, तरी भारतीय आव्हानास सज्ज
By admin | Published: November 6, 2016 02:47 AM2016-11-06T02:47:55+5:302016-11-06T02:47:55+5:30
आमचा संघ भारताच्या तुलनेत कमकुवत आहे, हे मी कबूल करतो; पण नेमकी हीच बाब दडपणातून बाहेर पडण्यास पुरेशी ठरेल आणि भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी
मुंबई : आमचा संघ भारताच्या तुलनेत कमकुवत आहे, हे मी कबूल करतो; पण नेमकी हीच बाब दडपणातून बाहेर पडण्यास पुरेशी ठरेल आणि भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत आव्हान पेलण्यास आम्ही सज्ज होऊ, असे इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुक याचे मत आहे.
इंग्लंड संघाने येथे दाखल होण्याआधी कमकुवत बांगलादेश्विरुद्ध कसोटी सामना तीन दिवसांत गमविला; पण राजकोट येथे ९ नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीत आम्ही सकारात्मक सुरुवात करू, असे कर्णधाराने स्पष्ट केले. जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताने २०१२ मध्ये ३१ वर्षीय कुकच्या नेतृत्वात इंग्लंडकडून १-२ ने पराभूत झाल्यापासून एकही स्थानिक मालिका गमविलेली नाही.
कुक पुढे म्हणाला, ‘नंबर वन किंवा नंबर दोन असलेल्या संघाविरुद्ध जेव्हा त्यांच्याच देशात मालिका खेळता तेव्हा खेळणे कठीण जाते. यजमान संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत असतो. भारतीय उपखंडात अधिक क्रिकेट न खेळलेल्या संघासाठी तर आणखीच कठीण होऊन जाते. इंग्लंडसाठी पाच सामन्यांचे आव्हान कठीण आहे.’ आमच्या संघाने गेल्या दोन वर्षांत मोठ्या मालिकांमध्ये अपेक्षेनुरूप कामगिरी केली. मागच्या वर्षी द. आफ्रिका दौऱ्यात त्यांच्या नंबर वन संघाला हरवून मालिका जिंकली. येथे परिस्थिती वेगळी आहे. पण विरोधी संघाच्या तुलनेत आम्ही भक्कम नसल्याने दडपणदेखील कमी आहे. अंतिम संघ निवडीसाठी मात्र आम्हाला काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील, असे कुकने सांगितले. (वृत्तसंस्था)