नोव्हाक जोकोविचचा धडाका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2016 12:38 AM2016-04-05T00:38:04+5:302016-04-05T00:38:04+5:30
जागतिक टेनिस क्रमवारीतील अव्वल खेळाडू असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आपला धडाका कायम राखताना तब्बल सहाव्यांदा मियामी ओपन
मियामी : जागतिक टेनिस क्रमवारीतील अव्वल खेळाडू असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आपला धडाका कायम राखताना तब्बल सहाव्यांदा मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला. विशेष म्हणजे यासह त्याने विक्रमी २८वे एटीपी टूर मास्टर्स विजेतेपद मिळवले आहे.
एक तास २५ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात जोकोविचने जपानच्या केई निशिकोरी याचे कडवे आव्हान सलग दोन सेटमध्ये परतावले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात सुरुवातीपासून वर्चस्व राखलेल्या जोकोविचने निशिकोरीला आपला हिसका दाखवताना ६-३, ६-३ असे सहजपणे लोळवले. यासह जोकोने अमेरिकेचा माजी दिग्गज टेनिसपटू आंद्रे आगासीच्या विक्रमाशी बरोबरी केली. आगासीनेही मियामी स्पर्धेत सहा वेळा बाजी मारली आहे. जोकोविचने स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावताना एकूण सहाव्यांदा बाजी मारली आहे.
विशेष म्हणजे या शानदार विजेतेपदासह जोकोच्या कमाईमध्येही जबरदस्त वाढ झाली आहे. १३ लाख डॉलर किमतीची बक्षीस रक्कम असलेल्या या स्पर्धेत बाजी मारल्यानंतर जोकोच्या कारकिर्दीची कमाई दहा करोड डॉलरपर्यंत पोहोचली आहे. जोकोने सलग चौथा आणि कारकिर्दीतील ६३वे जेतेपद पटकावल आहे. याआधी यावर्षी जोकोविचने आॅस्टे्रलियन ग्रँडस्लॅम, कतार आणि इंडियन वेल्स स्पर्धेत बाजी मारली होती. तसेच यंदाच्या वर्षी जोकोच्या विजय-पराभवाचा रेकॉर्ड २८-१ असा झाला आहे.