Cincinnati Open:नोव्हाक जोकोविचला कोरोनाची लस न घेणं पडलं महागात; सिनसिनाटी ओपनमधून झाला बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 16:02 IST2022-08-13T16:01:18+5:302022-08-13T16:02:57+5:30
२१ वेळा ग्रॅंड स्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचला मोठा झटका बसला आहे.

Cincinnati Open:नोव्हाक जोकोविचला कोरोनाची लस न घेणं पडलं महागात; सिनसिनाटी ओपनमधून झाला बाहेर
नवी दिल्ली : तब्बल २१ वेळा ग्रॅंड स्लॅम चॅम्पियन नोव्हाक जोकोविचला (Novak Djokovic) मोठा झटका बसला आहे. कोरोनाची लस न घेतल्यामुळे त्याला सिनसिनाटी ओपनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. नोव्हाकने कोरोनाची लस न घेतल्यामुळे त्याला अमेरिकेला जाता येणार नाही आणि यामुळेच त्याला सिनसिनाटी ओपन (Cincinnati Open) हार्डकोर्ड स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. तसेच न्यूयॉर्कमध्ये २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अमेरिका ओपनलाही तो मुकणार आहे.
सिनसिनाटी ओपनमधून बाहेर
सर्बियाच्या ३५ वर्षीय जोकोविचने यापूर्वीच त्याची भूमिका स्पष्ट केली होती. कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी आपण लस घेणार नसल्याचे त्याने स्पष्ट केले होते. याच कारणामुळे तो जानेवारीत पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये आणि अमेरिकेतील २ स्पर्धांमध्ये खेळू शकला नव्हता. लक्षणीय बाब म्हणजे त्याला मॉन्ट्रियलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेतूनही बाहेर राहावे लागले आहे. कारण अमेरिका आणि कॅनडामध्ये फक्त त्यांनाच प्रवेश दिला जात आहे ज्यांनी कोरोनाची लस घेतली आहे.
दिग्गज खेळाडू बाहेर
गतविजेत्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह, गाएल मोंफिल्स, रिली ओपेल्का आणि डोमॅनिक थीम हे दिग्गज खेळाडू देखील दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर आहेत. सेरेना विल्यम्स इथे खेळत असून दौऱ्यातील कदाचित तिची ही शेवटची स्पर्धा असण्याची दाट शक्यता आहे.
नोव्हाक जोकाविच कोरोनाची लस न घेतल्यामुळे यापूर्वी देखील वादात सापडला होता. जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनच्या आधी देखील कोरोनाची लस घेतली नव्हती, ज्यामुळे त्याला त्या देखील स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले होते. जोकोविचने या सर्व प्रकारानंतर ऑस्ट्रेलियन ओपनच्या आयोजकांविरूद्ध खटलाही लढवला होता.