नोवाक जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 09:22 AM2021-07-06T09:22:21+5:302021-07-06T09:25:19+5:30
जागतिक पुरुष क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू जोकोविचने १७ व्या मानांकित क्रिस्टियन गारिनचा ६-२, ६-४, ६-२ ने पराभव केला. तो ५० व्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.
विम्बल्डन : गतविजेत्या नोवाक जोकोविचने सोमवारी येथे १२ व्यांदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवत ११७ वर्षांपूर्वी पदार्पण करणाऱ्या आर्थर गोरेची बरोबरी साधली. त्याचप्रमाणे अनेक युवा खेळाडूंनी अंतिम आठमध्ये स्थान मिळविण्याचा इतिहास घडविला.
पुरुष विभागात ज्या खेळाडूंनी प्रथमच विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला त्यात कॅनडाचा डेनिस शापोवालोव, इटलीचा मॅटियो बरेटिनी, हंगेरीचा मार्टन फुकसोविच आणि रशियाचा कारेन खाचनोव यांचा समावेश आहे. महिला विभागात जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू ऑस्ट्रेलियाची ऐश बार्टी, बेलारुसची नंबर दोन आर्यना सबालेंका, ट्युनिशियाची ओंस जाबेर व झेक प्रजासत्ताकची कारोलिना पिलिसकोव्हा यांनी प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली.
जागतिक पुरुष क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू जोकोविचने १७ व्या मानांकित क्रिस्टियन गारिनचा ६-२, ६-४, ६-२ ने पराभव केला. तो ५० व्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.
विम्बल्डनमध्ये सर्वाधिक वेळा अंतिम ८ मध्ये स्थान मिळविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रॉजर फेडरर (१८) व जिम्मी कोनर्स (१४) यांच्यानंतर जोकोविच आता आर्थर गोरेसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी दाखल झाला. गोरेने विम्बल्डनची आपली पहिली लढत १८८८ मध्ये खेळली होती तर जोकोविचने २००५ मध्ये पदार्पण केले.
अन्य निकाल : पुरुष - कारेन खाचनोव्ह मात सेबेस्टियन कोर्डा ३-६, ६-४, ६-३, ५-७, १०-८, शापोवालोव मात राबर्टो बातिस्ता आगुट ६-१, ६-३, ७-५, बेरेटिनी मात इलिया इवाश्का ६-४, ६-३, ६-१, फुकसोविच मात आंद्रे रुबलेव ६-३, ४-६, ४-६, ६-०, ६-३.
महिला : ऐश बार्टी मात बारबोरा क्रेजसिकोवा ७-५, ६-३, ओंस जाबेर मात इगा स्वियातेक ५-७, ६-१, ६-१, सबालेंका मात इलेना रिबाकिना ६-३, ४-६, ६-३, कारोलिना पिलिसकोव्हा मात लियुडमिला समसोनोव्हा ६-२, ६-३, कारोलिना मुचोवा मात पाउला बाडोसा ७-६(६), ६-४.