जोकोविच विम्बल्डन ‘चॅम्पियन’, पटकावले २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 09:26 AM2022-07-11T09:26:32+5:302022-07-11T09:27:04+5:30
ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसवर केली मात
लंडन : सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने अपेक्षित कामगिरी करताना विक्रमी सातव्यांदा विम्बल्डन स्पर्धा जिंकली. चार सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात जोकोविचने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला ४-६, ६-३, ६-४, ७-६ (७-३) असे सहज नमवले.
जबरदस्त संयमी खेळ करताना जोकोविचने आपला दर्जा दाखवताना सलग चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकली. स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडररने सर्वाधिक ८ वेळा विम्बल्डन जेतेपद उंचावले आहेत. जोकोविचने अमेरिकेचा दिग्गज पीट सँप्रास याच्या सात विम्बल्डन जेतेपदांच्या कामगिरीची बरोबरी केली. तसेच, जोकोविचने तब्बल २१वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले असून, सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्यांमध्ये त्याने स्पेनच्या राफेल नदालनंतर (२२) दुसरे स्थान मिळविले. फेडरर २० ग्रँडस्लॅमसह तिसऱ्या स्थानी आहे.
उपांत्य सामन्यात नदालने पोटदुखीमुळे माघार घेतल्यानंतर किर्गिओसला पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळाली. जोकोविचविरुद्ध पहिला सेट जिंकून त्याने दिमाखात सुरुवातही केली. मात्र, यानंतर त्याने आपल्याच चुकांमुळे जोकोविचला सामना अक्षरश: बहाल केला. किर्गिओसने तब्बल ३० एस मारत जोकोविचला चांगलेच सतावले. मात्र, जोकोविचनेही मोक्याच्यावेळी १५ एस मारत किर्गिओसला जोरदार प्रत्युत्तर दिले.
धक्कादायक निकालाची होती अपेक्षा
सामन्यात सुरुवातीला आघाडी घेतल्यानंतर किर्गिओसकडून धक्कादायक निकालाची अपेक्षा होती. मात्र, नको त्यावेळी वेडेवाकडे फटके मारण्याची चूक केलेल्या किर्गिओसने मिळवलेली पकड गमावली. यामुळे त्याचे लक्षही विचलित झाले आणि अनेकदा त्याने आपला संयमही गमावल्याचे दिसून आले. दुसरीकडे, जोकोविचने आपला उच्च दर्जा दाखवून देताना कोणताही धोका न पत्करत किर्गिओसला सातत्याने चुका कारण्यास भाग पाडले आणि सलग तीन सेट जिंकून २१वे ग्रँडस्लॅम उंचावले.
सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद
१. राफेल नादाल (स्पेन) : २२
२. नोव्हाक जोकोविच (सर्बिया) : २१
३. रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड) : २०
सर्वाधिक विम्बल्डन विजेतेपद
१. रॉजर फेडरर : ८
२. नोव्हाक जोकोविच : ७
३. पीट सँप्रास (अमेरिका) : ७
४. बियोन बोर्ग (स्वीडन) : ५