आता उत्सुकता प्लेआॅफची
By admin | Published: May 16, 2017 01:33 AM2017-05-16T01:33:03+5:302017-05-16T01:33:03+5:30
आता आयपीएलच्या प्लेआॅफमध्ये खेळणारे चार संघ निश्चित झाले आहेत. नंबर वन मुंबई इंडियन्स विरुद्ध नंबर टू रायझिंग पुणे सुपरजायंट आणि त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स - सनरायझर्स हैदराबाद
अयाझ मेमन
संपादकीय सल्लागार
आता आयपीएलच्या प्लेआॅफमध्ये खेळणारे चार संघ निश्चित झाले आहेत. नंबर वन मुंबई इंडियन्स विरुद्ध नंबर टू रायझिंग पुणे सुपरजायंट आणि त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्स - सनरायझर्स हैदराबाद या अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या संघामध्ये एलिमिनेटर लढत होईल. मुंबई आणि पुणे संघांना एक अतिरिक्त संधी मिळेल अंतिम फेरी गाठण्याची. या सामन्यातील पराभूत संघ एलिमिनेटरमधील विजेत्या संघाविरुद्ध अंतिम फेरी गाठण्याच्या उद्देशाने खेळेल. तर, क्वालिफायर १ मधील विजेता संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल.
एकूणच ही पद्धत मला वाटते खूप चांगली आहे. कारण ज्या प्रकारे मुंबई आणि कोलकाता यांनी सुरुवात केली होती, ते पाहता दोन्ही संघ सहजपणे प्ले आॅफमध्ये प्रवेश करतील. परंतु, कोलकाता अव्वल दोन स्थानांमध्ये नसेल याची अजिबात कल्पना नव्हती. अखेरच्या ३-४ सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी काही प्रमाणात चांगली झाली नाही. अशा परिस्थितीमध्ये हैदराबादला वर येण्याची संधी मिळाली, तसेच खास करून पुण्याला जबरदस्त संधी मिळाली. पुण्याने मिळालेल्या संधीचे सोने करताना अव्वल दोन स्थानांमध्ये जागा मिळवली.
हैदराबाद - कोलकाता सामना दोन्ही संघांसाठी परीक्षा ठरेल. कारण हा सामना बंगळुरूमध्ये होणार आहे. त्याउलट क्वालिफायर १ चा सामना मुंबईसाठी काहीसा फायदेशीर ठरणार आहे, जो त्यांच्या घरच्या मैदानावर वानखेडेवर होणार आहे. पण माझ्या मते अशा निर्णायक क्षणी घरच्या मैदानाचा फायदा वगैरे अशा गोष्टी फार महत्त्वाच्या नसतात. कोणत्या संघामध्ये गुणवत्ता आहे, जिंकण्याची जिद्द किती आहे हे येथे सर्वांत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे क्वालिफायर १ चा सामना कसा रंगतो याचीच उत्सुकता सध्या रंगली आहे.
यंदाच्या सत्रात सर्वांत जास्त कोणत्या संघाने निराश केले असेल, तर ते रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने. गतवर्षी या संघाने उपविजेतेपद पटकावले होते. गेल्या वर्षी या संघाने शानदार प्रदर्शन केले होते. विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, शेन वॉटसन यांनी वर्चस्व राखले होते. हा संघ एक प्रकारे चमत्कारिक होता. कोणताही सामना असो आणि कोणतीही परिस्थिती असो धावा सहजपणे निघत होत्या. तसेच, मिशेल स्टार्क, यजुवेंद्र चहल यांनीही मोलाचे योगदान दिले होते. पण या वर्षी बँगलोर संघाचा एकही स्टार यशस्वी ठरला नाही. अनेक सामन्यांत तर गेलसारख्या विध्वंसक फलंदाजाला राखीव ठेवण्यात आले होते.
यावरून खूप काही शिकण्यासारखेही आहे. अनेक मोठे दिग्गज खेळाडू संघात असतील; मात्र ते एकत्रितपणे चमक दाखवत नसतील, संघाला कोणतीही दिशा नसेल, तर मग त्या संघाची वाईट स्थिती होते. काही प्रमाणात हीच अवस्था गुजरात लायन्सचीही झाली आहे. त्यांचा संघ समतोल नव्हता. गुजरातची फलंदाजी जबरदस्त मजबूत होती; मात्र गोलंदाजी खूप कमजोर होती. तसेच गोलंदाजीत फॉल्कनर आणि जडेजा अपयशी ठरले तर नुकसान जास्त होणार होते आणि तसेच झाले. त्यांच्यासाठीही निराशाजनक सांगता झाली. तसेच दिल्लीबाबत सांगायचे झाल्यास, त्यांची फलंदाजी खूप गुणवान होती. परंतु, कामगिरीत सातत्य नव्हते. सर्व युवा भारतीय होते. गोलंदाजीही चांगली होती. पण ज्या सातत्याची आवश्यकता होती ती दिसून आली नाही. हा संघ जेव्हा चांगला खेळला तेव्हा जबरदस्त होता आणि जेव्हा वाईट खेळला तेव्हा अत्यंत वाईट होता. किंग्ज इलेव्हन पंजाबचीही वेगळी गोष्ट नाही. अखेरच्या सामन्यात ज्या प्रकारे त्यांनी सामना गमावला ते आश्चर्यकारक होते. या सामन्याआधी मुंबईविरुद्ध २३० धावांचा एव्हरेस्ट उभारलेला हा संघ पुण्याविरुद्ध ७३ धावांत गडगडला. माझ्या मते यावर वीरेंद्र सेहवागने दिलेली प्रतिक्रिया खूप योग्य आहे की, ‘जे कोणी विदेशी स्टार येथे आले होते ते परिस्थिती किंवा खेळपट्टीला दोष देऊ शकत नाही.’ मुळात हेच मोठे आव्हान असते, जर तुम्ही याच दोन गोष्टींना घाबरत असाल, तर मोठे स्टार असून फायदा काय?