इंग्लंडची आता न्यूझीलंडपुढे परीक्षा
By admin | Published: February 20, 2015 01:43 AM2015-02-20T01:43:45+5:302015-02-20T01:43:45+5:30
सलामी लढतीत यजमान आॅस्ट्रेलियाकडून दारुण पराभव पत्करणाऱ्या इंग्लंडची उद्या शुक्रवारी सहयजमान न्यूझीलंडविरुद्ध कठोर परीक्षा राहील.
वेलिंग्टन : सलामी लढतीत यजमान आॅस्ट्रेलियाकडून दारुण पराभव पत्करणाऱ्या इंग्लंडची उद्या शुक्रवारी सहयजमान न्यूझीलंडविरुद्ध कठोर परीक्षा राहील. ‘अ’ गटात आॅस्ट्रेलियाने इंग्लंडचा गोलंदाजी मारा अक्षरश: फोडून काढल्यानंतर इयॉन मॉर्गन आणि त्याचे सहकारी न्यूझीलंडचे आव्हान कसे परतवून लावतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.
न्यूझीलंडने सलग विजयामुळे उपांत्यपूर्व फेरीचा मार्ग जवळपास निश्चित केला. सुरुवातीच्या सामन्यात १९९६ च्या विजेत्या लंकेला त्यांनी ९८ धावांनी नमविल्यानंतर दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडचा तीन गड्यांनी पराभव केला होता. इंग्लंडचा प्रवास मात्र खडतर होऊ शकतो. आॅस्ट्रेलियापाठोपाठ न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यास इंग्लंडला उपांत्यपूर्व फेरी गाठणे कठीण होऊन बसेल. संघाचे मनोबल उंचाविण्याची जबाबदारी कर्णधार मॉर्गनची आहे; पण तो स्वत: फॉर्ममध्ये नाही. गेल्या पाच डावांत त्याने केवळ दोन धावा केल्या. चांगली कामगिरी करण्याचा त्याच्यावर दबाव असेल. अॅलिस्टर कूककडून नेतृत्वाची धुरा सांभाळणाऱ्या मॉर्गनला उद्या धावा काढाव्या लागतील.
न्यूझीलंडसमोर फलंदाजीतील उणिवा दूर सारण्याचे आव्हान आहेच. स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अॅण्डरसन या गोलंदाजांविरुद्ध त्यांची गाठ असेल. (वृत्तसंस्था)
न्युझीलंड : बेंडन मॅक्युलम (कर्णधार), कोरी अॅण्डरसन, ट्रेंट बाउल्ट, ग्रांट एलिओट, मार्टिन गुप्टील, टॉम लॅथम, मिशेल मॅकक्लेनघन, नॅथन मॅक्युलम, कायल मिल्स, अॅडम मिल्ने, लुक रोंची (यष्टीरक्षक), टिम साऊथी, रॉस टेलर, डॅनिएल व्हिटोरी, केन विलियमन्सन
इंग्लंड : इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जेम्स अॅण्डरसन, गॅरी बॅलेन्स, इयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर (यष्टीरक्षक), स्टीवन फिन, अॅलेक्स हेल्स, क्रिस जॉर्डन, जो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, क्रिस वोक्स.