आता म्हणाल का रोहितची विकेट ढापली !
By admin | Published: June 16, 2017 08:26 AM2017-06-16T08:26:30+5:302017-06-16T09:40:37+5:30
भारताचा अव्वल सलामीवीर रोहित शर्मा काल पुन्हा बांगलादेशच्या गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरला. रोहित शर्मा खेळपट्टीवर उभा राहिला की, काय घडते..
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - भारताचा अव्वल सलामीवीर रोहित शर्मा काल पुन्हा बांगलादेशच्या गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरला. रोहित शर्मा खेळपट्टीवर उभा राहिला की, काय घडते याचा अनुभव पुन्हा एकदा बांगलादेशच्या गोलंदाजांनी घेतला. निदान इतक्या मोठया पराभवातून तरी, बांगलादेशचा संघ आणि त्यांचे चाहते योग्य तो धडा घेऊन शहाणे होतील आणि पुन्हा भारताच्या वाटयाला जाणार नाहीत अशी अपेक्षा करुया.
2015 वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्वफेरीत बांगलादेशची गाठ भारताबरोबर पडली होती. त्या सामन्यात रोहित शर्माला नाबाद ठरवण्याच्या पंचांच्या निर्णयावरुन बांगलादेशमध्ये प्रचंड वाद झाला होता. बांगलादेशी गोलंदाज रुबेल होसैनच्या चेंडूवर रोहितचा मिडविकेटला झेल पकडला पण रुबेलचा चेंडू कमरेच्यावर असल्याचे पंच अलीम दार यांनी रोहितला नाबाद ठरवले. रिप्लेमध्ये चेंडू योग्य उंचीवर असल्याचे दिसत होते. त्यामुळे रोहितचा विकेट ढापला असे बांगलादेशी क्रिकेटप्रेमींचे म्हणणे होते.
रोहित त्यावेळी 90 धावांवर खेळत होता. मिळालेल्या संधीचा फायदा घेत रोहितने बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्या सामन्यात रोहितने 137 धावा फटकावल्या. रोहितच्या या शतकी खेळीमुळे भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी 303 धावांचे आव्हान ठेवले होते. पण बांगलादेशचा डाव 193 धावात आटोपला आणि भारताने 109 धावांनी विजय मिळवला.
रोहितला बाद दिले असते तर, त्यावेळी भारताचा डाव दबावाखाली आला असता. त्यांना इतकी मोठी मजल मारता आली नसती. आम्ही भारताला पराभूत केले असते अशा वल्गना त्यावेळी बांगलादेशी क्रिकेटप्रेमींनी केल्या होत्या. बांगलादेशी मीडिया, माजी क्रिकेटपटू या सर्वांनीच त्यावेळी भारताबद्दल गरळ ओकली होती. बांगलादेशच्या क्रिकेट संघटनेचे माजी प्रमुख मुस्तफा कमाल त्यावेळी आयसीसीचे अध्यक्ष होते. त्यांनीही पंचांच्या निर्णयावर बोट ठेऊन सर्व काही आधीपासूनच फिक्स असल्याचा गंभीर आरोप केला होता.
या आरोपांमुळे त्यांना वर्ल्डकप विजेत्या संघाला ट्रॉफी देण्यापासून रोखण्यात आले. फायनलपासून दूर ठेवल्याने अखेर त्यांनी राजीनामा दिला होता. गुरुवारच्या सामन्यात बांगलादेशच्या 265 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितची नाबाद 123 धावांची खेळी निर्णायक ठरली. रोहितने बांगलादेशच्या संघाला कुठलाही आरोप करण्याची संधी न देता वर्चस्व राखले.
यापूर्वी काही सामन्यांमध्ये भारताला तुल्यबळ लढत दिल्याने आपला संघ भारताच्या तोडीचा असून, आपण भारताला हरवू शकतो असे बांगलादेशी चाहत्यांचा समज झाला होता. सोशल मीडियावरुन तशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. निदान आता तरी ते शहाणे होतील अशी अपेक्षा करुया.