आता सपोर्ट स्टाफमध्ये झहीर खानच्या निवडीवरुन राडा
By admin | Published: July 13, 2017 04:00 PM2017-07-13T16:00:31+5:302017-07-13T16:00:31+5:30
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांच्या नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर आता सर्वकाही आलबेल होईल असे क्रिकेटप्रेमींना वाटत होते.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांच्या नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर आता सर्वकाही आलबेल होईल असे क्रिकेटप्रेमींना वाटत होते. पण आता सपोर्ट स्टाफवरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. झहीर खानला गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर शास्त्री यांनी आक्षेप घेतला आहे. रवी शास्त्री येत्या सोमवारी गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीबरोबर चर्चा करणार आहेत.
शास्त्री यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारत अरुण हवे आहेत. भारत अरुण यांच्या निवड व्हावी यासाठी शास्त्री आग्रही आहेत. 2014 ते 2016 दरम्यान शास्त्री संघाचे संचालक असताना भारत अरुण गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी संभाळत होते. गुरुवारी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी सपोर्ट स्टाफ निवडण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले होते. झहीर संघासोबत नकोच असे शास्त्री यांचे म्हणणे नाही.
आणखी वाचा
गोलंदाजी प्रशिक्षकाऐवजी झहीरला गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती करावी अशी शास्त्रींची भूमिका आहे. झहीरकडे भरपूर माहिती आहे पण कोचिंगचा अनुभव नाही. झहीरच्या तुलनेत भारत अरुण यांच्याकडे गोलंदाजीतल्या ज्या तांत्रिक गोष्टी, बारकावे आहेत त्याचा अनुभव जास्त आहे असे शास्त्री यांचे मत आहे. झहीर संघाला वर्षातले 250 दिवस देऊ शकतो का ? ही शास्त्री यांना चिंता आहे. त्याने नेटमध्ये येऊन अरुण यांना सहाय्य करावे असे शास्त्री यांना वाटते.
मागच्यावर्षी झहीरने आपली सेवा देण्यासाठी बीसीसीआयकडे 4 कोटींची मागणी केली होती. पण बीसीसीआय त्याला इतकी रक्कम द्यायला तयार नव्हती. वास्तविक शास्त्रींची भूमिका पूर्णपणे चुकीची नाहीय. सपोर्ट स्टाफ म्हणून झहीर खान आणि राहुल द्रविडची निवड ही रवी शास्त्रींवर लादली गेलीय असेही म्हणता येईल. अनिल कुंबळेच्या आधीचे भारताच्या सीनियर संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रेग चॅपल, गॅरी कस्टर्न आणि डंकन फ्लेचर यांना त्यांच्या पसंतीचा सपोर्ट स्टाफ मिळाला होता. चॅपल यांनी सपोर्ट स्टाफमध्ये इयन फ्रेझर, कस्टर्न यांनी पॅड अपटॉन, इरीक सीमॉन्स आणि डंकन फ्लेचर यांनी ट्रेव्हर पेनीची निवड केली होती. त्यातुलनेत शास्त्रींना ते स्वातंत्र्य मिळालेले नाहीय.