आता ‘छोटे मियाँ’ही म्हणता येणार नाही
By Admin | Published: February 20, 2015 01:53 AM2015-02-20T01:53:39+5:302015-02-20T01:53:39+5:30
आयर्लंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड या तुलनेने कमकुवत मानल्या जाणाऱ्या संघांची कामगिरीही आश्चर्यचकित करणारी आहे.
अ कराव्या विश्वकप स्पर्धेत भारत, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी दिग्गज संघांची कामगिरी उल्लेखनीय ठरत असताना आयर्लंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड या तुलनेने कमकुवत मानल्या जाणाऱ्या संघांची कामगिरीही आश्चर्यचकित करणारी आहे. यातील अनेक संघ आयसीसीचे असोसिएट सदस्य आहेत. या संघांविरुद्ध दिग्गज संघ पूर्ण गुण वसूल करतील, असे मानले जात होते. या संघांच्या समावेशामुळे विश्वकप स्पर्धेतील रंगत कमी होईल, असे जाणकारांचे मत होते; पण या स्पर्धेत या संघांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. या संघांच्या कामगिरीमुळे त्यांच्याबाबत उल्लेख करताना आता ‘छोटे मियां’ किंवा ‘छोटे उस्ताद’ अशा शब्दांचा उल्लेख करणे योग्य वाटत नाही. या संघांनी दिग्गज संघांना घाम गाळायला भाग पाडले आहे.
आयर्लंड संघाने दोनदा विश्वविजेतेपद पटकाविणाऱ्या विंडीज संघाविरुद्ध विजय मिळविला. ‘आयरन लँड’ मानल्या जाणाऱ्या आयरिश संघाने प्रतिस्पर्धी संघाने दिलेल्या ३०४ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करीत दिग्गज संघांनी आम्हाला कमी लेखण्याची चूक करू नये, असा इशारा दिला आहे.
आयर्लंडचा कर्णधार विलियम पोर्टरफिल्डने या लढतीत विजय मिळविल्यानंतर प्रतिक्रिया देताना ‘नवखा’ संघ संबोधण्यावर आक्षेप नोंदविता होता. आम्ही दिग्गज संघांप्रमाणे निकाल नोंदवीत असल्याचे पोर्टरफिल्डने म्हटले होते.
आयर्लंडप्रमाणे स्कॉटलंड संघांची कामगिरीही उल्लेखनीय ठरली आहे. सह-यजमान व जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या न्यूझीलंडला ड्युनेडिनमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत स्कॉटलंडने घाम गाळायला लावला. या लढतीत ‘मॅक्युलम अॅण्ड कंपनी’ला विजय मिळविताना संघर्ष करावा लागला. नेल्सनमध्ये गुरुवारी यूएई संघाने झिम्बाब्वेविरुद्ध अशाच प्रकारची कामगिरी केली. वन-डे क्रिकेटमध्ये प्रथमच २८५ धावांची मजल मारताना अमिरात संघाने झिम्बाब्वे संघापुढे आव्हान निर्माण केले. झिम्बाब्वेने या लढतीत सरशी साधली असली तरी त्यासाठी त्यांना ६ गड्यांचे मोल द्यावे लागले.
विश्वकप स्पर्धेत ‘लहान’ संघाच्या कामगिरीची चर्चा होईल त्या वेळी केनिया संघाची नेहमी आठवण येईल. १९९६ मध्ये विश्वकप स्पर्धेत प्रथमच खेळताना केनिया संघाने वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला
होता. त्यानंतर २००३ च्या विश्वकप स्पर्धेत या संघाने कमाल केली. श्रीलंका, झिम्बाब्वे व बांगलादेश या कसोटी खेळणाऱ्या संघांना पिछाडीवर सोडत केनियाने उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत त्यांना भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तत्कालीन संघ तयार करण्याची जबाबदारी भारतीय निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी घेतली होती, हे विशेष. पण खेदाने नमूद करावे लागते की, २०१९ मध्ये इंग्लंडच्या यजमानपदाखाली आयोजित १२ व्या विश्वकप स्पर्धेत यापैकी मोजकेच संघ दिसणार आहे. पुढील विश्वकप स्पर्धेत केवळ १०
संघ सहभागी होणार आहेत.
कारण, आयसीसीसोबत संलग्न असलेले दोन संघ २०१८ मध्ये ढाक्यात होणाऱ्या विश्वकप पात्रता फेरीनंतर निश्चित होतील.