आता टार्गेट टी-२० वर्ल्डकपचे!
By admin | Published: December 10, 2015 12:38 AM2015-12-10T00:38:35+5:302015-12-10T00:38:35+5:30
गोव्याची पहिली आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू शिखा पांडे हिला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवायचे आहे.
सचिन कोरडे, पणजी
गोव्याची पहिली आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू शिखा पांडे हिला आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळवायचे आहे. हेच तिचे ‘ड्रीम’ आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिखाने आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. पणजी जिमखाना मैदानावर सराव झाल्यानंतर घामाघूम शिखाने ‘लोकमत’शी संवाद साधला. या वेळी तिने आपला इरादा स्पष्ट केला.
ती म्हणाली, कोणत्याही क्रिकेटपटूसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणे हे स्वप्नवत असते. विश्वचषक स्पर्धा माझ्यासाठी एक स्वप्न आहे. या स्पर्धेत दुसऱ्यांदा संधी मिळावी, यासाठी मी वाट्टेल ते प्रयत्न करीन आणि मला तसा आत्मविश्वासही आहे. असे झाल्यास दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक खेळणारी शिखा पहिली गोमंतकीय ठरेल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या टी-२० स्पर्धेला येत्या २ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. त्यासाठी गोव्याचा संघ कसून सरावाला लागलाय. पणजी जिमखान्यावर हा संघ तयारी करीत आहे. त्यानंतर येत्या २६ जानेवारीपासून भारताचा संघ आॅस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. यामध्ये संघ तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवेन, असाही विश्वास शिखाला आहे. आतापर्यंत मिळालेल्या संधीचे आपण सोने केले असून एक अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात बजावलेली भूमिका लक्षवेधी आहे, असेही ती म्हणाली. अविस्मरणीय खेळी...
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकाविलेले अर्धशतक आणि याच सामन्यात मिळवलेले तीन बळी ही कामगिरी अविस्मरणीय अशी आहे, असे शिखाने सांगितले. तीन एकदिवसीय सामन्यांच्या
मालिकेत भारतीय संघ ०-१ ने पिछाडीवर होता. या सामन्यात शिखाने ५६ चेंडूंत ५९ धावांची खेळी केली.