आता लक्ष्य ९० मीटरचे- नीरज चोप्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 05:49 AM2021-08-09T05:49:44+5:302021-08-09T05:50:07+5:30
भविष्यातील स्पर्धांसाठी सज्ज राहायचे आहे
टोकियो : ऑलिम्पिकमध्ये भारताला अॅथलेटिक्समधील पहिलेवहिले सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने आपल्या नव्या लक्ष्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. ‘ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर, आता माझे लक्ष्य ९० मीटरची फेक करण्याचे आहे,’ असे सांगत नीरजने आपले पुढील लक्ष्य सांगितले. अंतिम फेरीत सुवर्णपदक जवळपास निश्चित झाल्यानंतरही नीरजने ९०.५७ मीटरची विक्रमी कामगिरी मागे टाकण्याचा प्रयत्न केला; पण यामध्ये त्याला यश आले नाही.
आपल्या ऐतिहासिक कामगिरीनंतर नीरजने सांगितले की, ‘भालाफेक खेळामध्ये तंत्र अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक दिवसांच्या कामगिरीवर आणि फॉर्मवर सर्वकाही अवलंबून असते. त्यामुळे आता माझे पुढील लक्ष्य ९० मीटर अंतर पार करण्याचे आहे. यंदाच्या वर्षी मी केवळ ऑलिम्पिकवर लक्ष्य केंद्रित केले होते. आता मी सुवर्ण जिंकले असल्याने, आता पुढील स्पर्धांसाठी मी योजना बनवीन. भारतात परतल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी व्हिसा मिळविण्याचा मी प्रयत्न करीन.’
नीरजने १३ जुलैला गेटशीट डायमंड लीगमधून माघार घेतली होती. ऑलिम्पिकनंतर या सिरीजमधील बाकीच्या सत्रांमध्ये सहभागी होणार असल्याचे नीरजने म्हटले होते. लुसाने (२६ ऑगस्ट), पॅरिस (२८ ऑगस्ट) येथे होणाऱ्या या स्पर्धांसह ज्युरिख (९ सप्टेंबर) येथील स्पर्धांच्या अंतिम फेरीतही भालाफेकचा समावेश आहे.
माझ्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण नव्हते आणि ऑलिम्पिकमध्ये मी अन्य स्पर्धांप्रमाणेच सहभागी झालो होतो. यामुळे मला माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करता आले. मला सुवर्ण जिंकण्यास याचा फायदा झाला.
- नीरज चोप्रा