आता लक्ष्य टोकियो आॅलिम्पिक
By admin | Published: November 14, 2016 01:45 AM2016-11-14T01:45:02+5:302016-11-14T01:45:02+5:30
रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवित सर्वांचे लक्ष वेधणारा रोव्हिंगपटू नाशिकच्या दत्तू भोकनाळचे आता २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचे स्वप्न आहे.
नागपूर : रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवित सर्वांचे लक्ष वेधणारा रोव्हिंगपटू नाशिकच्या दत्तू भोकनाळचे आता २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचे स्वप्न आहे. स्वप्न साकार करण्यासाठी आतापासून तयारीला सुरुवात केली असल्याचे दत्तूने रविवारी सांगितले. गरीब कुटुंबात जन्मलेल्या दत्तू आज विश्व मधुमेह दिवसानिमित्त डॉ. सुनील गुप्ता मधुमेह केअर फाऊंडेशनतर्फे आयोजित चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी नागपुरात उपस्थित होता. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
दक्षिण कोरियात आयोजित एफआयएसए आशियन व ओसानिया आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या सिंगल स्कल इव्हेंटमध्ये रौप्यपदक पटकावित आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या दत्तूने रिओ आॅलिम्पिकचे अनुभव कथन केले. तो म्हणाला,‘ रिओ आॅलिम्पिकसाठी मी केवळ सहा महिन्यांपूर्वी तयारीला प्रारंभ केला होता. एक-दोन वर्षांपूर्वीपासून जर तयारीला प्रारंभ केला असता, तर निकाल नक्कीच वेगळा असता. पण, टोकियो आॅलिम्पिकसाठी आतापासूनच तयारीला प्रारंभ केला असून तेथे देशासाठी पदक पटकावण्यात नक्कीच यशस्वी ठरेल, असा विश्वास आहे.’
दत्तूने केंद्र सरकारतर्फे पुरविल्या जाणाऱ्या सुविधांवर समाधान व्यक्त केले. दत्तू म्हणाला,‘आॅलिम्पिकच्या तयारीसाठी सरकारने मला ३० लाख रुपये दिले होते. त्याचप्रमाणे अमेरिकेतील मियामी येथे प्रशिक्षणासाठी पाठविले होते, पण मला स्पर्धेची तयारी करण्यासाठी केवळ सहा महिन्यांचा कालवधी मिळाला.’
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील हा खेळाडू २०१२ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी सेनादलात नोकरीला लागला. २५ जवानांपैकी माझ्यासह केवळ दोघांची रोव्हिंगसाठी निवड झाली.त्याने या खेळात मोठी झेप घेतली. सध्या तो जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी आहे. दोन वर्षांच्या कालावधीत क्रमवारीत १०३ व्या स्थानावर १३ व्या स्थानावर झेप घेणारा तो भारताचा एकमेव रोव्हिंगपटू
आहे. रोव्हिंगमध्ये पदकाच्या आशा
पल्लवीत करण्यासाठी सरकाने ग्रामीण भागातील खेळाडूंवर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला दत्तूने यावेळी दिला. यावेळी पत्रकार परिषदेला डॉ. सुनील गुप्ता, डॉ. कविता गुप्ता, डॉ. अजय अंबाडे आणि प्रवीण ठाकरे आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)