आता लक्ष्य 90 मीटर भालाफेकीचे... डायमंड लीगमध्ये लय राखणार नीरज चोप्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 09:19 AM2023-08-31T09:19:11+5:302023-08-31T11:46:27+5:30
नीरजने २०२२ च्या सत्रात डायमंड लीगमध्ये रौप्य जिंकले होते.
झुुरिच : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने रविवारी बुडापेस्ट येथे ८८.१७ मीटर अंतराची भालाफेक करीत प्रथमच विश्वविजेता होण्याचा मान पटकविला. ही विजयी लय कायम राखताना गुरुवारी प्रतिष्ठेच्या डायमंड लीगमध्ये नामवंत खेळाडूंचे आव्हान मोडीत काढून ९० मीटर भालाफेक करण्याच्या निर्धाराने नीरज उतरणार आहे.
नीरजने २०२२ च्या सत्रात डायमंड लीगमध्ये रौप्य जिंकले होते. झेक प्रजासत्ताकचा जॉन जेलेझेनी आणि नॉर्वेचा एंड्रियास थॉरकिल्डसन यांच्यानंतर भारतीय सुपरस्टार नीरज हा ऑलिम्पिक तसेच विश्व चॅम्पियन बनलेला इतिहासातील केवळ तिसरा भालाफेकपटू ठरला.
जेलेझेनीने १९९२, १९९६ आणि २००० ला ऑलिम्पिक सुवर्ण, तर १९९३, १९९५ आणि २००१ ला विश्व चॅम्पियनशिपचे खिताब जिंकले होते. थॉरकिल्डसन याने २००८ ला ऑलिम्पिक आणि २००९ ला विश्व चॅम्पियनशिपचे सुवर्ण पटकावले होते.
२५ वर्षांचा नीरज यंदाच्या सत्रात अद्याप अपराजित आहे. विश्व चॅम्पियन बनण्याआधी त्याने ५ मे रोजी दोहा आणि ३० जून रोजी लुसाने येथील दोन डायमंड लीगमध्ये अव्वल स्थान संपादन केले. विश्व चॅम्पियन बनल्यानंतर तो चारच दिवसांनी पुन्हा मैदानात उतरेल. त्याला स्पर्धा झेक प्रजासत्ताकाचा जेकब वडलेज (बुडापेस्ट येथे ८६.६७ मीटरसह कांस्य विजेता), जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि ग्रेनेडाचा दोन वेळेचा विश्व चॅम्पियन ॲन्डरसन पीटर्स या दिग्गजांविरुद्ध असेल. बुडापेस्टमध्ये रौप्य जिंकणारा पाकिस्तानचा अर्शद नदीम झुरिचमध्ये दिसणार नाही.
नीरज चोप्राने मागच्या सत्रात डायमंड लीगची फायनल ट्रॉफी जिंकली. सध्याच्या सत्रातील दोन स्पर्धांमध्ये तो १६ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. वडलेचचे तीन स्पर्धांमध्ये २१ आणि वेबरचे तीन स्पर्धांमध्ये १९ गुण झाले. अनुभवी पीटर्स हा पात्रता गाठू शकलेला नाही. झुरिचमधील डायमंड लीगमधील अखेरची स्पर्धा असेल.
पुरुष भालाफेकचा फायनल टप्पा १६ आणि १७ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील युजीन शहरात होईल. येथेच डायमंड लीगचे जेतेपद निश्चित होणार आहे. गुणतालिकेतील अव्वल सहा खेळाडू युजीनमध्ये भालाफेक करू शकतील. नीरजने २०२२ ला झुरिचमध्ये फायनल जिंकली होती. लांब उडीतील भारतीय खेळाडू मुरली श्रीशंकर हादेखील येथे सहभागी होणार आहे. विश्व चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये अपयशी ठरलेल्या श्रीशंकरकडे आणखी एक संधी असेल. त्याची सध्याच्या सत्रातील सर्वांत लांब उडी ८.४१ मीटर इतकी आहे. पात्रता फेरीत त्याने ७.७४ मीटर अशी उडी घेतल्याने तो २२ व्या स्थानावर घसरला होता. डायमंड लीगच्या दोन स्पर्धांनंतर मुरली सध्या दहा गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.