आता कोहलीचा कस लागेल : वॉर्नर
By admin | Published: January 5, 2015 03:21 AM2015-01-05T03:21:03+5:302015-01-05T03:21:03+5:30
भारताचा नवीन कसोटी कर्णधार विराट कोहलीवर मानसिक दबाव वाढवण्याची मालिका कायम ठेवताना आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने सिडनीत होणा-या चौथ्या कसोटीत कोहली
सिडनी : भारताचा नवीन कसोटी कर्णधार विराट कोहलीवर मानसिक दबाव वाढवण्याची मालिका कायम ठेवताना आॅस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने सिडनीत होणाऱ्या चौथ्या कसोटीत कोहली किती आक्रमक कर्णधार आहे हे पाहू इच्छितो. तो म्हणाला, आता त्याचा खरा कस लागेल. गत कसोटीप्रमाणेच तो आक्रमकता दाखवतो किंवा नाही, हे मी पाहू इच्छितो.
महेंद्रसिंग धोनीने कसोटी क्रिकेटमधून अचानक घेतलेल्या निवृत्तीनंतर कोहलीकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. वॉर्नर म्हणाला, एम. एस. धोनी खेळाविषयी खूप विचार करतो आणि त्याच्यात खूप समज आहे. फलंदाजाला कसे बाद करायचे, हे त्याला माहीत आहे. तो खूप चतुर कर्णधार आहे. त्याच्यासमोर खेळणे हे खूपच आव्हानात्मक राहिले आहे. तो कोणती चाल रचेल याचे विचार नेहमी तुमच्या डोक्यात असतात.
आक्रमक वातावरणाविषयी वॉर्नरने कोणत्याही खेळाडूने मर्यादेचे उल्लंघन करायला नको, असे म्हटले. तथापि, त्याने स्वत: मर्यादेचे उल्लंघन केल्याचेही मान्य केले. तो म्हणाला, मी याआधी अनेकदा मर्यादेचे उल्लंघन केले. फक्त भारतीय संघाविरुद्धच नाही, तर आम्ही नेहमीच असे करतो आणि असाच विकेट घेण्याचा जल्लोष करतो. आम्हाला सर्वांनाच अतिउत्साही होऊ नये, यावर सर्वांनीच लक्ष द्यायला हवे. सर्वांत चांगली पद्धत म्हणजे त्या बाबींकडे दुर्लक्ष करून तुम्ही विकेट घेऊन उत्तर द्यायला हवे. अखेर तुमचाच विजय होईल.
तो पुढे म्हणाला, ‘‘मला शिकावे लागेल. भूतकाळातूनही मी शिकलो; परंतु आम्ही सर्वच माझ्याकडून शिकवण घेऊ शकता.’’
मिचेल जॉन्सन चौथी कसोटी खेळत नाही. त्यामुळे मैदानावर प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध टोमणेबाजीला साथ मिळू शकणार नाही, असेही विनोदाने वॉर्नर म्हणाला.
तो म्हणाला, मिचेल मला साथ देतो. त्यामुळे मी टोमणेबाजी कशी करू हे मला माहीत नाही. मिचेलमध्ये हा एक्स फॅक्टर आहे. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजालाही दहशत बसते की, मिचेलचे तीन किंवा पाच षटके खेळायची आहेत आणि ते खूपच कठीण असेल. तो म्हणाला, आमच्याकडे मिशेल स्टार्कसारखे १५० कि.मी. वेगाने गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. कमिन्स, जोश हेजलवूडदेखील १४०च्या गतीने गोलंदाजी करण्यास माहीर आहेत. (वृत्तसंस्था)