आता, हे आमच्या नोकरीच्या मागे लागले, पण...; बंजरंग पुनियानं स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 07:31 PM2023-06-05T19:31:02+5:302023-06-05T19:43:21+5:30
आता हे आमच्या नोकरीच्या मागे लागले आहेत, असे म्हणत ब्रिजभूषण सिंह यांच्यावर निशाणा साधला.
नवी दिल्ली - आंदोलक कुस्तीपटू त्यांच्या सरकारी नोकरीवर परतल्यानंतर त्यांनी आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त माध्यमांत आणइ सोशल मीडियात झळकले. मात्र, काही वेळांतच ऑलिंपिक विजेत्या साक्षी मलिक आणि बजरंग पुनियाने मीडियासमोर येऊन आपण आंदोलनावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. तसेच, नोकरीवर परतण्याचं कारण सांगत, आमचा लढा सुरूच राहिल. भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीवर आम्ही ठाम असल्याचंही त्यांनी स्पष्ट केल. मात्र, आता हे आमच्या नोकरीच्या मागे लागले आहेत, असे म्हणत ब्रिजभूषण सिंह यांच्यावर निशाणा साधला.
देशातील नामवंत कुस्तीपटू आणि ऑलिंपिक पदक विजेता बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्या नेतृत्वात कुस्तीपटूंचे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गेल्या एका महिन्यांपासून आंदोलन सुरू होते. पण, आता या तिघांनी आपल्या नोकरीवर परतण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरीवर परतले असले तरीदेखील पैलवानांचा विरोध कायम राहणार आहे. साक्षी मलिकने याबाबत ट्विट करुन माहिती दिली. त्यानंतर, साक्षीच्या पतीनेही माध्यमांतील वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलंय. तर, बजरंग पुनियानेही हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगितलं. मात्र, पुनियाने ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ते आमच्या नोकरीच्या मागे लागले आहेत, असे पुनिया यांनी म्हटलं.
आमच्या मेडलला १५-१५ रुपयांचे असल्याचा दावा करणारे आता आमच्या नोकरीच्या मागे लागले आहेत. जिथं आमचं आयुष्यच पटावर लागलंय, तिथं नोकरी हा किरकोळ विषय आहे. जर न्याय मिळवण्याच्या रस्त्यात नोकरी हा अडथळा असेल तर ती सोडून देण्यास आम्हाला १० सेकंदाचाही वेळ लागणार नाही. नोकरीचा भीती दाखवू नका, अशा शब्दात बजरंग पुनियाने ब्रिजभूषण सिंह यांच्यावर नाव न घेता पलटवार केलाय.
हमारे मेडलों को 15-15 रुपए के बताने वाले अब हमारी नौकरी के पीछे पड़ गये हैं.
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) June 5, 2023
हमारी ज़िंदगी दांव पर लगी हुई है, उसके आगे नौकरी तो बहुत छोटी चीज़ है.
अगर नौकरी इंसाफ़ के रास्ते में बाधा बनती दिखी तो उसको त्यागने में हम दस सेकेंड का वक्त भी नहीं लगाएँगे. नौकरी का डर मत दिखाइए.
दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर रेल्वे मुख्यालयाच्या रेकॉर्डनुसार, हरिद्वारमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर दुसऱ्याच दिवशी, ३१ मे रोजी साक्षी बडोदा हाउस ऑफिसमध्ये नोकरीवर परतली. साक्षीने नोकरी जॉइन करताच रेल्वे इंटर डिव्हिजन चॅम्पियनशिपलाही मान्यता दिली आहे. साक्षी, विनेश आणि बजरंग OSD स्पोर्ट्स पदावर कार्यरत आहेत. साक्षीने आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त मीडियात आणि सोशल मीडियात झळकले. मात्र, आपण माघार घेतली नसून आमचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं साक्षीसह बजरंग पुनिया व इतर कुस्तीपटूंनी म्हटलंय.
२३ एप्रिलपासून जंतर मंतरवर आंदोलन
विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन पुकारले होते. पैलवान २३ एप्रिलपासून जंतरमंतरवर होते. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. याआधी जानेवारीमध्येही कुस्तीपटूंनींनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केले होते. मात्र, क्रीडा मंत्रालयाच्या मध्यस्थीनंतर कुस्तीपटू परतले.