आता पाचव्या सेटमध्ये होणार टायब्रेकर
By admin | Published: September 27, 2015 12:09 AM2015-09-27T00:09:30+5:302015-09-27T00:09:38+5:30
टेनिसचा वर्ल्डकप समजल्या जाणाऱ्या डेव्हिस कप सामन्यात आघाडीच्या खेळाडूंचा सहभाग वाढावा व त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने
नवी दिल्ली : टेनिसचा वर्ल्डकप समजल्या जाणाऱ्या डेव्हिस कप सामन्यात आघाडीच्या खेळाडूंचा सहभाग वाढावा व त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) पुढील वर्षापासून स्पर्धेत पाचव्या सेटमध्ये टायब्रेकर आणण्याची घोषणा केली आहे.
डेव्हिस कपच्या सध्याच्या स्वरूपात पहिल्या चार सेटमध्ये टायब्रेकरचा उपयोग होत होता; परंतु पाचव्या सेटमध्ये ६-६ अशी स्थिती झाल्यास दोन गेम सलग जिंकणे आवश्यक असते. आयटीएफने आता पाचव्या सेटमध्ये टायब्रेकर आणण्याची घोषणा केली आणि त्याला २०१६पासून सुरुवात होईल. आयटीएफने चिलीच्या सेंटियागोमध्ये आपल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत या बदलाला मान्यता दिली आहे.
या वर्षी मार्च महिन्यात सुरुवातीला अर्जेंटिनाच्या लियोनार्डो मेयरने पहिल्या फेरीत ब्राझीलच्या जाओओ सोजा याचा ७-६, ७-६, ५-७, ५-७, १५-१३ असा पराभव केला होता. ही डेव्हिस कपच्या इतिहासातील एकेरीची सर्वांत प्रदीर्घ लढत ठरली होती. टेनिसमधील मुख्य चार ग्रँडस्लॅम स्पर्धा आॅस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि यूएस ओपन यांपैकी यूएस ओपन या एकमेव ग्रँडस्लॅम स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील प्रत्येक सेटमध्ये टायब्रेकरचा उपयोग केला जातो. अन्य तीन ग्रँडस्लॅममध्ये निर्णायक सेटमध्ये टायब्रेकरचा उपयोग केला जात नाही.
टेनिसच्या इतिहासातील सर्वांत प्रदीर्घ लढत २०११मधील विम्बल्डनमध्ये झाली होती. ही लढत तीन दिवसांत ११ तास ५ मिनिटांपर्यंत रंगली होती. या सामन्यात अमेरिकेच्या जॉन इस्नरने फ्रान्सच्या निकोलस माहूतचा ६-४, ३-६, ६-७, ७-६, ७०-६८ असा पराभव केला होता. (वृत्तसंस्था)