अबकी बार, चार सौ पार

By admin | Published: March 18, 2017 05:09 AM2017-03-18T05:09:13+5:302017-03-18T05:09:13+5:30

आॅस्ट्रेलियाला मात देण्यासाठी पहिल्या दोन कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्या बनवण्यात आल्यामुळे दोन्ही संघांना एकाही डावात तीनशेचा टप्पा गाठता

Now times, four hundred crosses | अबकी बार, चार सौ पार

अबकी बार, चार सौ पार

Next

रांची : आॅस्ट्रेलियाला मात देण्यासाठी पहिल्या दोन कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्या बनवण्यात आल्यामुळे दोन्ही संघांना एकाही डावात तीनशेचा टप्पा गाठता आला नव्हता. मात्र, रांचीत सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत मात्र आॅस्ट्रेलियाने पहिल्यांदाच चारशे पार धावसंख्या उभारली. भारतीय फलंदाजांनी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४५१ धावसंख्येला सकारात्मक प्रत्युत्तर देताना दिवसअखेर १ बाद १२० धावांची मजल मारली.
सलामीवीर लोकेश राहुलने (६७) मालिकेतील आपले चौथे अर्धशतक झळकावले आणि मुरली विजयसोबत (नाबाद ४२) सलामीला ९१ धावांची भागीदारी केली. मालिकेत भारतातर्फे सलामीला झालेली ही सर्वोत्तम भागीदारी आहे. भारताला फॉलोआॅन टाळण्यासाठी १३ धावांची गरज आहे, पण विराट कोहलीचा फिटनेस संघासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे अन्य फलंदाजांवर मोठी खेळी करण्याची जबाबदारी आहे.
सध्याच्या मालिकेत भारतातर्फे सर्वोत्तम फलंदाज असलेल्या राहुलने कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्यांदा अर्धशतकी खेळी केली. मोठी खेळी करण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या राहुलला कमिन्सने तंबूचा मार्ग दाखवला. त्याने १०२ चेंडूंना सामोरे जाताना ९ चौकार लगावले. विजयनेही दुसऱ्या टोकाकडून चांगली फलंदाजी केली. कारकिर्दीतील ५० वा कसोटी सामना खेळणारा विजय ४२ धावा काढून नाबाद असून त्याला चेतेश्वर पुजारा (१०) साथ देत आहे.
जेएससीएची खेळपट्टी अद्याप फलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे भासत आहे.
त्याआधी, भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या (५ बळी) अचूक माऱ्यापुढे आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव ४५१ धावांत संपुष्टात आला. उमेश यादवने ३ बळी घेतले. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ १७८ धावा काढून नाबाद राहिला. जडेजाने कसोटी कारकिर्दीत आठव्यांदा डावात पाच बळी घेण्याची कामगिरी केली. ग्लेन मॅक्सवेलने (१०४) शतकी खेळी करीत आॅस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
गुरुवारी दिवसअखेर ११७ धावांवर नाबाद असलेल्या स्मिथने मायकल क्लार्कचा (१३०) विक्रम मोडला. स्मिथने आज भारतात आॅस्ट्रेलियन कर्णधारातर्फे सर्वोत्तम धावसंख्या नोंदवणार कर्णधार म्हणून विक्रम केला. त्याने ३६१ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १७८ धावांची खेळी केली. त्यात १७ चौकारांचा समावेश आहे. त्याने मॅक्सवेलसोबत मालिकेतील सर्वोत्तम १९१ धावांची भागीदारी केली.
डावखुरा फिरकीपटू जडेजाने १२४ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. त्याने उपाहारापूर्वी तीन चेंडूंच्या अंतरात दोन बळी घेतले. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडने ५० चेंडूंमध्ये ३७ धावांची खेळी करीत स्मिथसोबत सहाव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी केली. जडेजाने वेड व कमिन्स (०) यांना उपाहाराला १० मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना बाद केले. त्यामुळे भारतीय तंबूत उत्साह संचारला. जडेजाने पहिल्या सत्रात तीन बळी घेतले. रविचंद्रन आश्विनला (१-११४) दुसऱ्या दिवशी बळी घेता आला नाही. जडेजाने सर्वाधिक ४९.३ षटके गोलंदाजी केली. जडेजाने राहुलच्या थ्रोवर हेजलवुडला धावबाद करीत आॅस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला.
उपकर्णधार अजिंक्य रहाणेने गोलंदाजीमध्ये काही चांगले बदल केले, पण आज पहिला बळी घेण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. मॅक्सवेलने उमेश यादवच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच शतकाची वेस ओलांडली. क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपामध्ये (टी-२०, वन-डे व कसोटी) शतक ठोकणारा तो जगातील १३ वा तर आॅस्ट्रेलियाचा दुसरा खेळाडू ठरला. आॅस्ट्रेलियातर्फे शेन वॉटसनने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतकी खेळी केली आहे. (वृत्तसंस्था)

धावफलक
आॅस्ट्रेलिया पहिला डाव : मॅट रेनशॉ झे. कोहली गो. यादव ४४, डेव्हिड वॉर्नर झे. व गो. जडेजा १९, स्टीव्हन स्मिथ नाबाद १७८, शॉन मार्श झे. पुजारा गो. आश्विन ०२, पीटर हँड्सकोंब पायचित गो. यादव १९, ग्लेन मॅक्सवेल झे. साहा गो. जडेजा १०४, मॅथ्यू वेड झे. साहा गो. जडेजा ३७, पॅट कमिन्स त्रि. गो. जडेजा ००, स्टीव्ह ओकिफे झे. विजय गो. यादव २५, नॅथन लियोन झे. नायर गो. जडेजा ०१, जोश हेजलवुड धावबाद ००. अवांतर (२२). एकूण १३७.३ षटकांत सर्वबाद ४५१. बाद क्रम : १-५०, २-८०, ३-८९, ४-१४०, ५-३३१, ६-३९५, ७-३९५, ८-४४६, ९-४४९, १०-४५१. गोलंदाजी : ईशांत २०-२-७०-०, यादव ३१-३-१०६-३, आश्विन ३४-२-११४-१, जडेजा ४९.३-८-१२४-५, विजय ३-०-१७-०.
भारत पहिला डाव : लोकेश राहुल झे. वेड गो. कमिन्स ६७, मुरली विजय खेळत आहे ४२, चेतेश्वर पुजारा खेळत आहे १०. अवांतर (१). एकूण ४० षटकांत १ बाद १२०. बाद क्रम : १-९१. गोलंदाजी : हेजलवुड ९-२-२५-०, कमिन्स १०-१-२२-१, ओकिफे १०-३-३०-०, लियोन ११-०-४२-०.

Web Title: Now times, four hundred crosses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.