आश्विन कसोटीत नंबर वन
By Admin | Published: January 1, 2016 12:55 AM2016-01-01T00:55:05+5:302016-01-01T00:55:05+5:30
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या मालिकेत शानदार कामगिरी करणारा आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन २0१५च्या अखेरीस गुरुवारी जाहीर झालेल्या आयसीसी
दुबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या मालिकेत शानदार कामगिरी करणारा आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विन २0१५च्या अखेरीस गुरुवारी जाहीर झालेल्या आयसीसी रँकिंगमध्ये नंबरवन कसोटी गोलंदाज बनला.
आश्विनने वर्षभरातील ९ कसोटी सामन्यांत ६२ विकेट घेतल्या. त्यातील ३१ बळी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत घेतले. १९७३ मध्ये बिशनसिंग बेदी यांच्यानंतर नंबरवन गोलंदाज बनणारा आश्विन हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. याआधी बेदी हे कसोटी गोलंदाजी रँकिंगमधील अव्वल स्थानी राहिलेले पहिले भारतीय गोलंदाज होते. भागवत चंद्रशेखर, कपिलदेव आणि अनिल कुंबळे हे त्यांच्या कारकिर्दी दरम्यान दुसऱ्यास्थानी होते. एवढेच नव्हे तर आश्विन कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतदेखील नंबरवन ठरला आहे. गेल्या तीन वर्षांत आश्विन दुसऱ्यांदा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आपल्या कारकिर्दीत प्रथमच कसोटीतील नंबरवन गोलंदाज बनणाऱ्या आश्विनने दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेन याला मागे टाकले आहे.